मुंबईत कहानी में ट्विस्ट... BJP ने तिकीट न दिल्याने `हा` बडा नेता थेट ठाकरेंच्या सेनेत? निवडणूक लढणारच
Maharashtra Assembly Election 2024 Big Blow To BJP In Mumbai: भाजपाने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर त्यांना बंडखोरीचा पहिला फटका मुंबईत बसण्याची दाट शक्यता आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Big Blow To BJP In Mumbai: विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपली 99 जणांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये अनेक विद्यमान आमदारांबरोबर नवीन चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. 20 ऑक्टोबर रोजी दुपारी ही यादी जाहीर केल्यानंतर तिकीट न मिळालेल्या इच्छूकांची नाराजी दूर करण्याचं आव्हान पक्षातील वरिष्ठ नेत्यांसमोर असतानाच काहींनी लगेच टोकाचा निर्णय घेत बंडखोरी करण्याचा मार्ग स्वीकारल्याचंही दिसत आहे. असाच राजकीय ड्रामा दक्षिण मुंबईमध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. विधानसभेची भाजपाची पहिली यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी दक्षिण मुंबईसारख्या हाय प्रोफाइल मतदारसंघातून होणार असल्याची माहिती 'झी 24 तास'ला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
हा नेता करणार बंडखोरी
दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून भाजपाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना तिकीट दिलं आहे. मात्र दक्षिण मुंबईमधून भाजपाला या निर्णयानंतर माजी मंत्री राज पुरोहित मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. राज पुरोहित हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'झी 24 तास'ला दिली आहे. पुरोहित हे कुलाबा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. पुरोहित यांनी भारतीय जनता पार्टीकडे कुलाब्यामधून तिकीट देण्याची मागणी केली होती. मात्र त्यांची ही मागणी पक्षाने डावलली. या मतदारसंघातून भाजपाने राहुल नार्वेकरांना तिकीट दिलं असल्याने आता पुरोहित बंडखोरीच्या मार्गावर असल्याची माहिती मिळत आहे. राज पुरोहित हे मुंबई भाजपाचे माजी अध्यक्ष असून पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत.
थेट ठाकरेंच्या सेनेत प्रवेश?
बंडखोरी करुन पुरोहित उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून राज पुरोहित यांच्यासारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याला राहुल नार्वेकरांविरुद्ध तिकीट दिलं जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. खरोखरच पुरोहित यांना तिकीट मिळालं तर कुलाब्यामध्ये पुरोहित विरुद्ध नार्वेकर अशी रंगतदार लढत पाहायला मिळू शकते.
मुंबईसहीत उपनगरामधील भाजपाचे प्रमुख उमेदवार खालीलप्रमाणे:
कुलाबा - राहुल नार्वेकर
मलबार हिल - मंगल प्रभात लोढा
वडाळा - कालिदास कोळंबकर
सायन कोळीवाडा - आर. तमिल सेल्वन
वांद्रे पश्चिम - आशिष शेलार
घाटकोपर पश्चिम - राम कदम
विले पार्ले - पराग अलवणी
अंधेरी पश्चिम - अमीत साटम
गोरेगाव - विद्या ठाकूर
मलाड पश्चिम - विनोद शेलार
चारकोप - योगेश सागर
कांदिवली पूर्व - अतुल भातळखकर
मुलुंड - मिहिप कोटेचा
दहिसर- मनीषा चौधरी
बेलापूर - मंदा म्हात्रे
ऐरोली - गणेश नाईक
ठाणे - संजय केळकर
डोंबिवली - रविंद्र चव्हाण
कल्याण पूर्ण - सुलभा गायकवाड