`त्यांचं म्हणणं अगदी बरोबर...`; छगन भुजबळांकडून जरांगेंचं समर्थन! म्हणाले, `मराठा समाजाचे...`
Maharashtra Assembly Election 2024: मागील बऱ्याच काळापासून आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये वैचारिक मतभेद दिसून आले असून अगदी टोकाची टीका झाल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असतानाच आता हे विधान समोर येत आहे.
Maharashtra Assembly Election 2024: मराठा आरक्षणाची मागणी करणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणतेही उमेदवार देणार नसल्याचं जाहीर करत माघार घेत असल्याचं सांगितलं. सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जरांगेंनी ही भूमिका घेतल्यानंतर मागील बऱ्याच काळापासून त्यांच्याबरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वैचारिक मतभेद असलेले मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगेंच्या भूमिकाचं स्वागत केलं आहे. या निमित्ताने बऱ्याच काळानंतर या दोघांचे एका गोष्टीवर एकमत झाल्याचं दिसून आलं आहे.
भुजबळ म्हणाले, जरांगेंचा निर्णय योग्य कारण...
जरांगेंनी एकाच समाजाच्या आधारावर निवडणुक लढता येणार नाही असं सांगत अर्ज दाखल करणाऱ्या मराठा आंदोलकांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितलं. तसेच कोणाला पाडण्याची आपली भूमिका नसल्याचं ते म्हणाले. यासंदर्भात छगन भुजबळांनी प्रसारमाध्यंमांशी संवाद साधला. "त्यांनी जो निर्णय घेतला आणि विधान केलं आहे त्याचं मी स्वागत करतो. खरं तर 'देर आये दुरुस्त आये' असं म्हणायला हरकत नाही. त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. एका समाजाच्या आधारावर निवडणूक लढली जात नाही," असं छगन भुजबळ म्हणाले.
"विशेष म्हणजे सामाजिक संस्था सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करु शकतात. त्यांनी निवडणूक लढवायचं ठरवलं तर इतर समाज साध देत नाहीत, असंही होतं. त्यामुळे मराठा समाजाचे आमचे बांधव-भगिनी मोकळेपणाने मतदान करतील. निवडणुकीत भाग घेतील. कुठलंही दडपण घेणार नाहीत. तसंही आपण पाहिलं तर सर्व पक्षातून जे उमेदवार उभे राहिले आहेत ते पाहिल्यास 20 टक्के आरक्षणात गेले, 15 ते 20 टक्के इतर सामाजाला दिले असतील तरी सर्व पक्षांचे 60 ते 70 टक्के उमेदवार मराठा समाजाचेच आहेत. त्यामुळे जरांगेंचा निर्णय मला योग्य वाटतो," असंही छगन भुजबळांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> बिनशर्त परतफेडीचा फॉर्म्युला ठरला? सरवणकरांचे माघार घेण्याचे संकेत; त्या मोबदल्यात मनसे...
सर्वांना सोबत घेऊन जावं लागतं
मुस्लीम आणि ओबीसी समाजाची यादी न आल्याने माघार घेत असल्याचं जरांगे म्हणालेत असा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भुजबळांनी, "त्यांनी म्हटलं त्याच्यावर काय म्हणणार? सर्व धर्मीय आणि समाजाचा पाठिंबा हवा आहे, असा त्याचा अर्थ आहे. पक्ष असतात त्यांचा प्रयत्न असतो की सर्व धर्मीय आणि समाजाला सोबत घेऊन जावं," असं म्हटलं.
नक्की वाचा >> Maharashtra Assembly Election: ...तर मला अटक करतील; जाहीर सभेत CM शिंदेंनी व्यक्त केली भीती
आंदोलन आणि राजकारण दोन वेगळे विषय
आंदोलन आणि राजकारण दोन वेगळे विषय असल्याचं भुजबळ म्हणाले. "मराठा समाजाचं आंदोलन हा भाग वेगळा आहे. मी समता परिषदेचे काम करतो. मात्र सामाजिक काम वेगळं असतं. आम्ही निवडणूक लढवत नाही. सामाजिक संस्थेचा आहे म्हणून मतदान करा असे होत नाही. त्यांचे काम ते करतील त्रुटी सांगत राहतील. महाराष्ट्रातील निवडणूका मोकळ्या पद्धतीने होतील. सामाजिक सलोखा राहील असे वाटते, त्यांच्या म्हणण्यानुसार, सगळे उमेदवार मोकळेपणाने भूमीका मांडतील," असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला.