Mahayuti Distribution of Ministry Formula: महायुतीने ऐतिहासिक कामगिरी करत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश संपादन केल्यानंतर सत्तास्थापनेसाठी हलचाली सुरु झाल्या आहेत. एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या विजयी आमदारांना विजयाचं सर्टिफिकेट घेऊन मुंबईत बोलवण्यात आलं आहे. अजित पवारांच्या पक्षातील नवनिर्विचित आमदारांची 'सागर' बंगल्यावर बैठक झाली असून त्यांनी गटनेता म्हणून अजित पवारांची निवड केली आहे. अजित पवारांच्या पक्षाने 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर भारतीय जनता पार्टीने 132 जागा जिंकल्या असून शिंदेंच्या शिवसेनेनं 57 जागांवर बाजी मारली आहे. महायुतीने 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला आहे. या विजयानंतर आता सत्तेमध्ये प्रत्येक घटक पक्षाला सत्तेत कसा वाटा मिळणार यासंदर्भातील फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमका हा फॉर्म्युला कसा असेल ते पाहूयात...


असं होणार मंत्रिपदांचं वाटप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार, जितके आमदार निवडून आले आहेत त्यांच्या संख्येनुसार मंत्रिपदांचं वाटपं केलं जाईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीमधील घटकपक्षांच्या मंत्रिपदाच्या फॉर्म्युलानुसार दर सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रिपद दिलं जाणार आहे. याच समिकरणानुसार 132 जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक मंत्रिपदं मिळणार आहेत. तर त्या खालोखाल शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेतील सर्वात मोठा वाटा मंत्रिपदाच्या रुपाने मिळेल. महायुतीमधील सर्वात कमी जागा जिंकणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला त्याचप्रमाणामध्ये मंत्रिपदं दिली जाणार आहे.


...म्हणजे कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार?


प्रत्येक सहा ते सात आमदारांमागे एक मंत्रिपद असा विचार केल्यास 132 जागा जिंकणाऱ्या भाजपाला नव्या सरकारमध्ये 22 ते 24 मंत्रिपदं मिळतील. 57 जागा जिंकणाऱ्या शिंदेंच्या पक्षाला 10 ते 12 मंत्रिपदं मिळू शकतात. त्याचप्रमाणे 41 जागा मिळवणाऱ्या अजित पवारांच्या पक्षाला एकूण 8 ते 10 मंत्रिपदं मिळतील असा अंदाज आहे. सध्या मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा होणं बाकी आहे. असं असतानाच या तिन्ही नेत्यांच्या संमतीने मंत्रिपदाचा फॉर्म्युला निश्चित करुन तो वरिष्ठांना कळवला जाणार आहे. मुख्यमंत्रिपदाबरोबरच मंत्रिपदाच्या फॉर्म्युलाला वरिष्ठांनी होकार दिल्यानंतर कोणतं खातं कोणाला द्यायचं याबद्दलचा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. सध्या तरी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आपलाच नेता मुख्यमंत्री होणार अशाप्रकारचे दावे केला जात असून अनेक ठिकाणी तसे बॅनर्सही झळकल्याचं पाहायला मिळत आहे.