महाराष्ट्रात मतदानाची वेळ संपल्यानंतर झालेल्या मतदानाची टक्केवारी संशयास्पद; 76 लाख मतं वाढल्याचा नाना पटोलेंचा आरोप
Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीतल्या धक्कादायक पराभवानंतर मविआनं ईव्हीएमविरोधात जनआंदोलन करण्याचं ठरवल्यानंतर आता मविआच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरच संशय व्यक्त केलाय. तसेच वाढलेल्या टक्केवारीवर विरोधी पक्षांनी शंका उपस्थित केलीय.
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ संपल्यानंतर झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवर महाविकासआघाडीने संशय व्यक्त केला आहे. संध्याकाळी सहा वाजल्यानंतर महाराष्ट्रात जवळपास 76 लाख मतं वाढल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय. मतदानाच्या वेळेनंतर वाढलेली 7.83 टक्के मतांनी निवडणुकीचं पारडं फिरवल्याचा आरोप करण्यात आलाय. नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर शंका उपस्थित केलीय.
मतदानाच्या टक्केवारीवरून पटोले यांनी शंका व्यक्त करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीनंही यासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्याचा दावा केलाय. यावेळी पटोले यांनी एक व्हिडीओसुद्धा माध्यमांना दाखवला.
पटोले यांच्याप्रमाणंच शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही मतदानप्रक्रियेवर आक्षेप घेतलाय. महाराष्ट्राप्रमाणं हरियाणा विधानसभा निवडणुकीतही मतदानाची वेळ संपल्यानंतर साडेपाच टक्के मतं वाढली होती. त्यामुळं हरियाणातही भाजपचा विजय झाल्याचा दावा आव्हाडांनी केलाय.
लोकशाही टिकवण्यासाठी निवडणूक आयोगानं याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन शहानिशा करावी,अशी मागणी रोहित पवार यांनी केलीय निवडणूक आयोगानं जनतेचं मत चोरण्याचं काम केल्याचा आरोप मविआच्या नेत्यांनी केलाय. विरोधकांनी आरोप केलेत खरे पण या आरोपांना मजबूत आधार असणारे पुरावे गोळा करण्याचं आव्हान मविआसमोर असणार आहे.
विरोधकांच्या ईव्हीएमच्या आरोपावरून राधाकृष्ण विखे पाटलांनी निशाणा साधलाय. ईव्हीएमवर विश्वास नाही म्हणून लोकसभेच्यावेळी त्यांच्या खासदारांनी राजीनामा देऊन टाकायला हवा होता, असं विखेंनी म्हटलंय.
निकालानंतर ईव्हीएमबाबत विरोधकांकडून अनेक शंका उपस्थित केल्या जातायेत...त्यामुळे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना फटकारलंय...सर्वोच्च न्यायलयाने ईव्हीएमबाबतचे सर्व आरोप मोडीत काढलेत,आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी ते सिद्ध करावेत असं पाटील म्हणालेत.