महाविकास आघाडीत एकमेकांना टोकाचा विरोध? `त्या` मागणीवरुन ठाकरे विरुद्ध दोन्ही काँग्रेस
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोर आलेला असतानाच महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार की काय अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याला कारण ठरत आहे मुख्यमंत्री पद!
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तयारीला महाविकास आघाडीबरोबरच महायुतीमधील घटक पक्षांनीही तयारी सुरु केली आहे. दोन्ही बाजूकडील पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरुन उलट सुलट चर्चा सुरु असतानाच आता महाविकास आघाडीत या मुद्द्यावरुन वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षानी मांडलेल्या भूमिकेला काँग्रेसने थेट विरोध केला आहे. तर या विषयावरुन आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची भूमिका अगदीच परस्परविरोधी दिसत आहे.
उद्धव ठाकरेंचा पक्ष काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीपूर्वी किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने (Thackeray Faction) मांडली आहे. 16 ऑगस्टला महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करा, आपण त्या चेह-याला पाठिंबा देऊ असं म्हटलं होतं. परंतु यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने ठोस उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळं पुन्हा आता किमान चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याची भूमिका ठाकरे गटाने व्यक्त केल्याची सुत्रांची माहिती आहे. आता ही मागणी समोर येताच दोन्ही काँग्रेसने आपलं मत उघडपणे व्यक्त केलं आहे.
काँग्रेसची भूमिका थेट ठाकरेंच्या पक्षाच्या विरुद्ध
महाविकास आघाडीत सध्यातरी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरती चर्चा नको, अशी भूमिका काँग्रेसने मांडली असल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून किमान चार भिंतीआड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याच्या भुमिकेनंतर काँग्रेस नेत्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आधी विधानसभेच्या निवडणुकांना एकत्रित सामोरे जाऊ, त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊ, असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. काँग्रेस नेत्यांची ही भूमिका उद्धव ठाकरे यांना मान्य होणार का? हे पहावं लागणार आहे.
शरद पवार गट म्हणतो, '...त्या चेहऱ्याला आमचा पाठिंबा'
मुख्यमंत्री पदावरून काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात धुसफूस सुरू असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे. आमच्या पक्षाचा चेहरा 'शरद पवार' आहेत, असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. महाविकास आगाडी सांगेल त्या चेहऱ्याला आमचा पाठिंबा असेल असं शरद पवारांच्या पक्षाने म्हटलं आहे. ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावरून काँग्रेसमध्ये नाराजी असतानाच राष्ट्रवादीने आपली ही भूमिका मांडली आहे. आम्ही आमची निवडणूक पवार यांच्या चेहऱ्यावर लढवणार असल्याचं राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडी देणार त्या नेत्याला आम्ही थेट पाठिंबा देऊन असं शरद पवारांच्या पक्षाने जाहीर केलं आहे.
म्हणजेच सध्याची स्थिती पाहात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुन महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध दोन्ही काँग्रेस अशी स्थिती निर्माण झाल्याचं दिसत आहे.