Maharashtra Assembly Election 2024 MNS Raj Thackeray Meet: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती एकही जागा लागली नाही. मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच असं घडलं आहे की त्यांचा एकही आमदार विधानसभेमध्ये नसणार. या पराभवानंतर राज ठाकरेंनी अवघ्या तीन शब्दांचं, 'अविश्वसनीय, तुर्तास एवढेच...' अशी पोस्ट केली होती. यानंतर राज ठाकरेंनी आज पराभूत आमदारांबरोबर पराभवाच्या कारणांची माहिती घेण्यासाठी, चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबरची जवळीक घातक ठरल्याचं मत पराभूत उमेदवारांनी नोंदवल्याची माहिती समोर येत आहे. 


अमित ठाकरेही पराभूत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज राज ठाकरेंनी मुंबईमधील निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेतलं. या बैठकीमध्ये ईव्हीएमसंदर्भातील काही तक्रारी पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंकडे केल्या. तसेच भाजपाबरोबरची जवळीक आपल्याला फायद्याची ठरलेली नाहीये, असं पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंना सांगितलं आहे. राज ठाकरेंनी मुंबई आणि उपनगरांमधून एकूण 42 उमेदवार उभे केले होते. मात्र एकही उमेदवार जिंकून आला नाही. इतकेच काय तर स्वत: राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे सुद्धा दादर-माहिम मतदारसंघातून तिसऱ्या स्थानी राहत पराभूत झाले. पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही.


सभांना गर्दी होत होती मग...


याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आज महत्त्वाची बैठक बोलावली होती. राज ठाकरेंनी या बैठकीला मुंबई आणि परिसरातील पराभूत उमेदवारांना बोलावलं होतं. नेमका पराभव झाला तो कशामुळे झाला याची चाचपणी राज ठाकरेंनी या बैठकीमध्ये केली. मनसेच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत होता, सभांना गर्दी होत होती मग त्याचं रुपांतर मतांमध्ये का झालं नाही? यावर या बैठकीत चर्चा झाली. किमान चार ते पाच जण निवडून येतील अशी अपेक्षा मनसेला होती. मात्र 138 उमेदवार उभे करुन एकही उमेदवार निवडून आला नाही. यावेळेस बैठकीमधील पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात आली.


राज ठाकरे काहीच बोलले नाहीत


लोकसभा निवडणुकीला भाजपाशी जवळीक करत बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेला भाजपाशी जवळीक करणं फायद्याचं ठरलेलं नाही असं पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंशी बोलताना कळवलं. या सगळ्या गोष्टींची नाराजी उमेदवारांनी व्यक्त केली आहे. या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी कोणतही मार्गदर्शन केलं नाही. त्यांनी केवळ पराभूत उमेदवारांना काय वाटतं हे जाणून घेतलं. आता राज ठाकरे यानंतर काय बोलणार, प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार का हे अजून गुलदस्त्यातच आहे.