70000 Crore Irrigation Scam R R Patil Ajit Pawar: राज्याच्या राजकारणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुन्हा कथित 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा चर्चेत आला आहे. तासगावमध्ये संजय पाटील यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तासगावमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पाटील यांचे दिवंगत वडील तसेच राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासंदर्भात खळबळजनक दावा केला. गृहमंत्री असताना आर. आर. पाटील यांनीच या 70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या फाइलवर स्वाक्षरी केल्याने आपण चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याचं विधान अजित पवारांनी केलं. आर. आर. पाटलांनी केसाने गळा कापला, असं विधान अजित पवारांनी केलं. यामुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे हा उल्लेख करताना अजित पवारांनी फडणवीसांचा उल्लेख केला. विरोधकांकडून अजित पवारांनी आर. आर. पाटलांसारख्या नेत्यावर त्यांच्या निधनानंतर असं बोलायला नको होतं, असं म्हणत टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की वाचा >> 'सदा सरवणकर माघार घेणार?' ऐकताच अमित ठाकरे हात जोडून म्हणाले, 'मी माझ्या...'


अजित पवार फडणवीसांचा उल्लेख करत नेमकं काय म्हणाले?


आर. आर. आबांनी आपला केसाने गळा कापला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा फाईल कशी तयार झाली याबद्दल तासगावमधील जाहीर सभेत भाष्य केलं. त्यावर आपली चौकशी करण्यासाठी आर. आर. आबांनी सही कशी केली याचा उलगडा अजित पवारांनी केला.  आर. आर. पाटलांनी आपल्याला कामाला लावले, अशी खंत देखील अजित पवारांनी व्यक्त केली. "मला 70 हजार कोटींची भ्रष्टाचाराचा आरोप झाला. फाईल तयार केली. अजित पवारांची ओपन चौकशी करण्याची सही आर आर पाटील यांनी केली. वाईट वाटले. आपलं काही तर चुकलं असेल तर पण आपल्याला कामाला लावून गेला. त्या फाईलवर आबांनी केलेली. सहीबद्दल देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मला कोणी सही केली हे दाखवलं होतं," असं अजित पवार म्हणाले.


नक्की वाचा >> अर्ज भरतानाच सरवणकरांचा मास्टर स्ट्रोक! आता स्वत: CM शिंदे, राजही काही करु शकत नाहीत; कारण...


फडणवीस म्हणाले, 'सिंचन घोटाळ्याची फाईल...'


मुंबईमध्ये प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी अजित पवारांनी केलेल्या याच विधानासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं. "आर. आर. आबा हयात नाहीत त्यामुळे बोलणं बरोबर नाही. परंतु काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातच सिंचन घोटाळ्याची फाईल उघडली गेली आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.