`शाहांना वाटलं असेल देवेंद्रजींची सीट जरा अडचणीत आहे म्हणून...`; अजित पवारांचं विधान
Zee 24 Taas Exclusive Ajit Pawar React On Devendra Fadnavis Will Be Next CM: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी `झी 24` तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना `टू द पॉइण्ट` या कार्यक्रमामध्ये विशेष मुलाखतीत दिली. त्यामध्येच त्यांनी अमित शाहांच्या विधानावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Zee 24 Taas Exclusive Ajit Pawar React On Devendra Fadnavis Will Be Next CM: महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे राज्यातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस असतील असे संकेत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी जाहीर सभेमध्ये दिले. याचसंदर्भात 'झी 24 तास'च्या 'टू द पॉइण्ट' या कार्यक्रमात कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी दिलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अमित शाह नेमकं काय म्हणाले?
अमित शाहांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं बिगुल इचलकरंजी (कोल्हापुर), कराड आणि सांगलीमध्ये जाहीर सभा घेतल्या. या सभांमधील एका भाषणात अमित शाहांनी, "महाराष्ट्रातील जनतेची एकच भावना आहे. आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना विजयी करायचे आहे," असं विधान केलं. मागील अनेक महिन्यांपासून राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याबद्दल चर्चा होताना दिसतेय. यामध्ये महायुतीकडून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं नावही चर्चेत आहे.
अमित शाहांच्या वक्तव्यावर अजित पवार काय म्हणाले?
अमित शाहा म्हणाले की देवेंद्रजींकडे राज्याचं नेतृत्व द्यायचं आहे. अशाप्रकारचं त्यांनी काल एक विधान केलेलं आहे काल, असं म्हणत कमलेश सुतार यांनी प्रश्न विचारला. या प्रश्नावर अजित पवारांनी, "तुम्ही इतकं वेगळं सांगताय, त्यांनी सांगितलं..." असं म्हणत असतानाच कमलेश सुतार यांनी, "देवेंद्रजी को जिताना है!" असं मूळ वाक्य सांगितलं. त्यावर अजित पवारांनी हसून, " हा... त्यांनी सांगितलं देवेंद्रजी को जिताना है," असं म्हटलं. यावर कमलेश सुतार यांनी, "महायुती को जिताना है असंही म्हणू शकले असते ना?" असा सवाल केला.
या प्रश्नावर, "आहो, देवेंद्रजी को जिताना है... त्यांना असं वाटलं असेल देवेंद्रजींची सीट जरा अडचणीत आहे. म्हणून त्यांनी धुळ्यातून सांगितलं असेल नागपूरवाल्यांना देवेंद्रजी को जिताना है," असं अजित पवारांनी हसत हसतच म्हटलं. "या वाक्यातून कसा अर्थ काढावा. मी म्हटलं ना मराठी भाषेतून जसा अर्थ काढावा तसा काढला जातो," असं अजित पवार म्हणाले. संधी आहे फडणवीसांना मुख्यमंत्री होण्याची? या प्रश्नावर अजित पवारांनी, "सगळ्यांनाच संधी आहे," असं उत्तर दिलं.