शरद पवारांकडून बीडमध्ये बेरजेचं राजकारण, पण कोणाच्या हाती देणार तुतारी?
Beed Vidhansabha: शरद पवारांनी बीडमध्ये बेरजेचं राजकारण करत पक्षप्रवेश करवून घेतले. पण पवार उमेदवारीची तुतारी कुणाच्या हाती देणार याची उत्सुकता आहे.
Beed Vidhansabha: बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा उमेदवार कोण? असा प्रश्न निर्माण झालाय. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आहेत त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार अशी दाट शक्यता आहे. दुसरीकडं नुकताच पक्षप्रवेश केलेल्या ज्योती मेटेंनीही उमेदवारीसाठी आग्रही भूमिका घेतलीये. त्यामुळं पवार संदीप क्षीरसागरांऐवजी दुसरा उमेदवार देतात की ज्योती मेटेंना घेऊन मराठा-कुणबी समीकरण पक्क करतात याबाबत उत्सुकता निर्माण झालीय.
लोकसभा निवडणुकीपासून गोपीनाथ मुंडेंच्या बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बोलबाला आहे. बीडच्या राजकारणात शरद पवार आणि जरांगे फॅक्टर अतिशय महत्वाचा ठरु लागलाय. त्यामुळंच बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कोण उमेदवार देतोय याकडं मराठवाड्याचं लक्ष लागलंय. बीड विधानसभा मतदारसंघात संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. पण त्यापूर्वीच ज्योती मेटे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आलाय. लोकसभेवेळी उमेदवारी हुकली पण यावेळी उमेदवारी नक्की असल्याचं ज्योती मेटेंनी सांगितलंय.
बीड विधानसभा मतदारसंघात राजकीय तटबंदी मजबूत करण्यासाठी शरद पवारांनी वेगळीच रणनिती आखली असावी अशी शक्यता आहे. ज्योती मेटेंना सोबत घेऊन बीड विधानसभेत मराठा आणि ओबीसींची मोट बांधण्याची शरद पवारांची खेळी असावी. संदीप क्षीरसागरांना विधानसभा तर परिषदेवर ज्योती मेटेंची वर्णी लावण्याचा पवारांचा हेतू असावा.भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्या पक्षप्रवेशाचंही तेच गणित असावं असा अंदाज आहे.
शरद पवारांनी बीडमध्ये बेरजेचं राजकारण करत पक्षप्रवेश करवून घेतले. पण पवार उमेदवारीची तुतारी कुणाच्या हाती देणार याची उत्सुकता आहे. ज्योती मेटे, राजेंद्र मस्केंना उमेदवारी देऊन पवारांनी संदीप क्षीरसागर यांना बाजूला व्हायला सांगितल्यास ते काय भूमिका घेतात याकडं बीडचं लक्ष लागलंय.
बीडच्या राजकारणात मोठी उलथापालथ
बीड जिल्ह्यातल्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ घातलीय. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भाऊबहिणींच्या राजकीय मनोमिलनानं भाजपमधील अनेक प्रस्थापितांवर विस्थापित होण्याची वेळ आलीय. बीड भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी कमळ सोडून हाती तुतारी घेतलीये. ही फक्त सुरुवात असून पुढच्या दहा दिवसांत बीड भाजपमधून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग होण्याची शक्यता आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी तसे संकेत दिलेत.बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी चार जागांवर राष्ट्रवादीनं दावा केलाय. दोन जागा भाजपच्या ताब्यात आहेत. 2019मध्ये सहाच्या 5 जागा लढवणाऱ्या भाजपला यावेळी अवघ्या दोन जागांवरच लढायला मिळणार आहे. ही अस्वस्थता शरद पवारांनी हेरलीये. शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीपासून व्युहरचना आखण्यास सुरुवात केलीय. त्यामुळं येत्या काळात भाजपचा बालेकिल्ला रिकामा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.