Bitcoin Scam Allegation On Supriya Sule Sharad Pawar Reacts: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या रात्री भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीच संस्थापक शरद पवार यांच्या कन्या तसेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप केले. सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बिटकॉन्सच्या माध्यमातून घोटाळा करत मोठ्याप्रमाणात पैसा विधानसभा निवडणुकीला वापरल्याचा आरोप भाजपाने दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेमध्ये भाजपाचे नेते सुधांशु त्रिवेदी यांनी अगदी व्हॉट्सअपचे कथित स्क्रीनशॉट शेअर करत सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले. मात्र या आरोपांवर शरद पवारांनी मतदानाला जाताना प्रसारमाध्यमांशी बोलताना मोजक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली.


भाजपाने काय आरोप केले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुधांशु त्रिवेदी यांनी मंगळवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत, महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले. काँग्रेसला तुम्ही कोणत्या बिटकॉइन व्यवहारांमध्ये सहभागी आहात का? असा सवाल त्रिवेदी यांनी विचारला. सुधांशु यांनी सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंवरही गंभीर आरोप केले. "फारच गंभीर आणि चिंताजनक गोष्टी समोर आल्या आहेत. या मधून महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार हळूहळू समोर येत आहे. हे प्रकरण म्हणजे स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकींवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार आहे," असं त्रिवेदी यांनी म्हटलं.


भाजपाने केलेल्या दाव्यानुसार नाना पटोले, सुप्रिया सुळे, पोलीस कमिश्नर अमिताभ गुप्ता आणि डीलर अमिताभ यांनी एकमेकांना व्हॉइस नोट्स पाठवल्या होत्या. त्रिवेदी यांनी व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट दाखवत, "या चॅट आणि नोट्समधून हे दिसत आहे की सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंनी बिटकॉइनमधून व्यवहार केले जात आहेत," असा दावा केला. "आता असं वाटत आहे की ते योग्य मार्गाने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असते तर अशाप्रकारे बेकायदेशीर माध्यमातून पैसा कमवण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नसता," असा टोला सुधांशु त्रिवेदी यांनी लगावला.


शरद पवार काय म्हणाले?


शरद पवारांना सुप्रिया सुळेंवर केलेल्या कथित बिटकॉन घोटाळ्यासंदर्भातील प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यांनी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं. "आरोप करणारी व्यक्ती अनेक महिने तुरुंगात होती. त्यामुळे त्या व्यक्तीच्या म्हणण्याची नोंद तरी कशाला घ्यायची. माझ्या मते त्या व्यक्तीच्या बोलण्याची नोंदही घेण्याची आवश्यकता नाही," असं शरद पवार म्हणाले.


सुप्रिया सुळेंनी थेट निवडणूक आयोगाकडे केली तक्रार


सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या आरोपांनंतर सुप्रिया सुळेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "भाजपा घाणेरडं राजकारण करत आहे. सुधांशु त्रिवेदींविरोधात मी मानहानीचा खटला दाखल करणार आहे. मी अशा कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही. यामध्ये माझा आवाज तयार करुन वापरण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडे मी याबाबत तक्रार केली आहे," असं सुप्रिया यांनी सुधांशु त्रिवेदींनी केलेल्या आरोपांवर बोलताना म्हटलं आहे. 



सुधांशु त्रिवेदींनी केलेल्या आरोपांसंदर्भात सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाकडे एक तक्रार करणारं पत्रही लिहिलेलं आहे. सुप्रिया सुळेंच्यावतीने त्यांच्या वकिलांनी लिहिलेल्या पत्रामध्ये, "पुण्याचे माजी आयपीअस अधिकारी रविंद्रनाथ पाटील आणि गौरव मेहतांविरोधात तात्काळ सायबर फसवणुकीची तक्रार दाखल केली जावे. हे सुप्रिया सुळेंबद्दल खोटी माहिती पसरवत आहेत," असं म्हटलं आहे.