`अर्ज मागे घ्या अन्यथा...`, भाजपाने दिला जाहीर इशारा; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले `तुमचं भलं...`
Chandrashekhar Bawankule on BJP Candidates: भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) आपले सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपा (BJP) एकूण 156 जागांवर निवडणूक लढणार आहे. तर इतर जागांवर एकनाथ शिंदेंची शिवसेना (Eknath Shinde Shivsena), अजित पवारांची राष्ट्रवादी (Ajit Pawar NCP) आणि मित्रपक्ष निवडणूक लढणार आहे.
Chandrashekhar Bawankule on BJP Candidates: भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) आपले सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपा (BJP) एकूण 156 जागांवर निवडणूक लढणार आहे. तर इतर जागांवर एकनाथ शिंदेंची शिवसेना (Eknath Shinde Shivsena), अजित पवारांची राष्ट्रवादी (Ajit Pawar NCP) आणि मित्रपक्ष निवडणूक लढणार आहे. दरम्यान भाजपाच्या अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी पक्षाने उमेदवार जाहीर केला असतानाही बंडखोरी करत अर्ज भरला आहे. या सर्वांना भाजपाने आपला अर्ज मागे घेण्यास सांगितलं आहे. जे अर्ज मागे घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
पक्षातील बंडखोरी शमवण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न सुरु आहेत? असं विचारलं असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "परवा रात्री आमची बैठक झाली. देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचे सर्व राज्याचे निवडणूक संचालन समिती या बैठकीत होते. सर्व जिल्हाध्यक्ष, नेत्यांना आम्ही सूचना दिल्या आहेत. एकावेळी एका ठिकाणी एकच व्यक्ती लढू शकते".
पुढे ते म्हणाले, "नाराजीतून काहींनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. माझी विनंती, सूचना यांचं प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी पालन करेल असं मला वाटतं. पक्ष आईसारखा आहे, पक्षावर श्रद्धा ठेवून पक्ष भलं करेल ही भावना ठेवून अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते अर्ज मागे घेतील असा 100 टक्के विश्वास आहे. जे मागे घेणार नाहीत त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल".
राज ठाकरेंनी भाजपा सत्तेत असेल असं विधान केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, "राज ठाकरेंनी आपली व्यक्तिगत भूमिका मांडली आहे. त्यांना त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे आमचे मित्र असून, कौटुंबिक संबंध आहेत. त्यांनी आपली भूमिका मांडली असून, त्या सद्भावना आहेत. त्यांच्या भावना आधीपासून आमच्या पक्षासोबत आहेत. मोदींच्या विकसित भारतीय संकल्पाला साथ देण्यासाठी छोट्या कार्यालयात जाऊन, मुंबईत सभेत त्यांनी मतं मागितली. मुंबईतील सभेत त्यांनी मोदींसाठी आवाहन केलं. त्यांची भूमिका स्पष्ट असून यावरुन त्यांनी हे वक्तव्य केलं आहे".
मनोज जरांगे यांचं आंदोलन सामाजिक आहे. त्याला राजकारणाशी जोडू नये. सत्तेतून समाजाला न्याय मिळतो हे खरं आहे. आमची सत्ता मराठा समाजाला, आोबीसी समाजाला न्याय देत आहे. त्यामुळे जरांगे यांच्या भूमिकेवर मी फार बोलणं योग्य नाही असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
सदा सरवणकर यांच्याबाबत विचारलं असता त्यांनी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे असं सांगितलं. राज ठाकरे एखाद्या वेळी आमच्या विरोधात लढले असतील. पण विकासाच्या दृष्टीने ते आमच्यासोबत आहेत. आम्ही मुख्यमंत्रीपदाकरता नाही तर 14 कोटी जनतेसाठी निवडणूक लढत आहोत. राज ठाकरेही विकासाला साथ देतील असं त्यांनी सांगितलं.
रवी राजा यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना त्यांनी पक्षात कोणतंही नेतृत्व आलं की फायदा होतो. प्रभावी नेतृत्व पक्षात आलं की पक्ष वाढतो असं सांगितलं.
अनिल देशमुख यांनी मनसुख हिरेन प्रकरणावरुन केलेल्या आरोपांवर ते म्हणाले की, "ते दिवस गेले आता. निवडणुकीला सोमोरे जा. लोक आजकाल ऐकत नाहीत. ते प्रकरण कोर्टात सुरु आहे. महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचं राज्य करण्यासाठी महाविकास आघाडीचा अजेंडा काय आहे?. तुमचा जाहीरनामा काय आहे ते दाखवा. कसा विकास करणार आहात, जनतेला काय देणार आहात? लाडकी बहीण योजना बंद करायला निघायला आहात. जरा विकासासाठी बोला. डायरीत लिहिलं हे सगळं आता सोडा. जेलमध्ये वेळ होता तेव्हा डायरी लिहिली असेल," असा टोला यावेळी त्यांनी लगावला.