Maharashtra Assembly Election Eknath Shinde Kolhapur Rally:  महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी कोल्हापूरमध्ये मोठी जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत महिलांना देण्यात येणारी रक्कम वाढवणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. महायुतीच्या या सभेत 10 वचनांची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली. यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.


यंदाही इतिहास घडणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आजची सभा खूप ऐतिहासिक आहे. 1995 साली बाळासाहेब ठाकरे यांनी इथूनच प्रचाराचा शुभारंभ केला आणि इतिहास घडला. यावेळी देखील तेच घडणार आहे. आई अंबाबाईने नेहमीच आम्हला आशीर्वाद दिला आहे. आज देखील आई अंबाबाई आम्हला आशीर्वाद देईल. 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळायला इथं येऊ," असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळेस त्यांनी एकूण 10 कलमांची घोषणा केली.


शिंदेंनी केलेल्या 10 घोषणा


1) राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाही 2100 रुपये, पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती.
2) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत 15 हजार रुपये. 
3) प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्यांची हमी.
4) वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपयांची मदत.
5) जीवनावश्यक वस्तूंच्या   किंमती स्थिर ठेवणार.
6) राज्यातील तरुणांना 25 लाख रोजगार देणार.
7) 45 हजार पांदण रस्ते बांधणार.
8) अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना 15 हजार रुपये वेतन.
9) वीज बिलात ३० टक्के कपात.
10) शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र 2029 सादर करणार.


पंतप्रधान महाराष्ट्रमध्ये आले की याच्या पोटात गोळा येतो


पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, "हा फक्त ट्रेलर आहे, सविस्तर वचननामा लवकरच तुमच्या समोर येईन," असंही उपस्थितांना सांगितलं. विकासाचे मारेकरी म्हणून महाविकास आघाडीची ओळख आहे. ज्यांना शक्तिपीठ नको असेल तर त्याच्यावर आम्ही ही योजना लादणार नाही. ज्यांना हवे त्यांना आम्ही ही योजना देणार. राज्याचा सर्वांगीण विकास करणार. शिवाजी महाराज याचे मंदिर झालेच पाहिजे, पण ज्या वेळी तुम्ही मुख्यमंत्री होता त्यावेळी सर्व मंदिर बंद केली, पण आम्ही सर्व मंदिर उघडली," असं म्हणत शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा थेट उल्लेख न करता त्यांच्यावर निशाणा साधला. "देशभरात होणाऱ्या गुंतवणूकीत महाराष्ट्राचा वाटा 52 टक्के आहे. आज महाराष्ट्र गुंतवणुकीमध्ये अव्वल एक नंबरला आहे. पंतप्रधान महाराष्ट्रमध्ये आले की याच्या पोटात गोळा येतो. खोटं बोलायचे रेटून बोलायचे अशी त्याची पद्धत. फेक नेरेटिव्ह करून लोकांची दिशाभूल केली," असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.



पोकळ धमक्यांना घाबरणार नाही


तसेच, "धनुष्यबाण बाळासाहेब याचे आहे म्हणूनच आम्ही ते जीवापाड जपत आहोत. आम्ही पोकळ धमक्यांना घाबरणार नाही. लाडक्या बहिणीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी जर जेल मध्ये जावं लागणार असेल तर अनेक वेळा जाऊ. पूर्वी आमचे ठरलंय असं म्हणतं होते. पण आत्ता कोल्हापूरचं वारं फिरलंय," असं मुख्यमंत्री म्हणाले.