Maharashtra Assembly Election CM Eknath Shinde: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं दादर-माहीम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंविरुद्ध विद्यमान आमदार सदा सरवणकरांना उमेदवारी दिली. सरवणकरांनी माघार घेण्यासंदर्भात बरेच प्रयत्न झाले तरी अखेरपर्यंत त्यांनी उमेदवारी मागे घेतली नाही आणि या ठिकाणी शिंदेंची सेना विरुद्ध मनसे असा संघर्ष होताना दिसत आहे. त्यातच दुसरीकडे राज ठाकरेंनी मागील काही दिवसांमध्ये अनेकदा महायुतीचं सरकार येईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असंही म्हटलं आहे. याच दोन्ही विषयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'झी 24 तास'च्या 'टू द पॉइण्ट' या विशेष कार्यक्रमात भाष्य केलं आहे. 


'मोदीजींचा मी आभारी'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुलखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्याकडे राज्यातील सर्वात महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्यासंदर्भातही भाष्य केलं. "मी मुख्यमंत्री होणं या सर्व खरं म्हणजे अनपेक्षित गोष्टी होत्या. अनैसर्गिक आघाडी झाली तेव्हा आम्हाला निर्णय घ्यावा लागला. यासाठी मोदीजींनी माझ्यावर विश्वास टाकला. मोदीजींचा मी आभारी आहे. फडवणीस यांनी विश्वास दाखवला. मी मुख्यमंत्री जरी असलो तरी मी कार्यकाता म्हणूनच काम करतो," असंही शिंदे म्हणाले. 


राज ठाकरेंच्या मुलाविरुद्ध उमेदवाराबद्दल काय म्हणाले?


राज ठाकरेंच्या मुलाविरुद्ध उमेदवार दिल्यासंदर्भात विचारण्यात आलं असता एकनाथ शिंदेंनी, "त्यांचा पक्ष निवडणूक लढवत आहे. आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. माहीम जागेबाबत कम्युनिकेशन गॅप होता," असं सांगितलं. "वेळेत सर्व गोष्टी झाल्या पाहिजे होत्या. सीट शेरिंगच्या वेळी बोलणं झालं पाहिजे होतं. राज ठाकरे यांच्याबरोबर माझं बोलणं झालं होत पण योग्य वेळी बोलणं झालं पाहिजे होतं," असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 


'मुख्यमंत्री फडवणीस होणार'वरही भाष्य


राज ठाकरे म्हणालेत 'मुख्यमंत्री फडवणीस होणार' यावर मुख्यमंत्र्यांनी "हे त्यांचे म्हणणे आहे," असं मोजक्या शब्दात उत्तर दिलं. 


महायुतीचा आकडा महत्त्वाचा


"महायुतीचा आकडा आमच्यासाठी महत्वाचा आहे. महायुतीच्या 170 जागा येतील. माझ्यासोबत आलेले सर्व आमदार निवडून येतील. महायुतीचा स्ट्राईक रेट जास्त असणार," असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. 


आरक्षणावरही केलं भाष्य 


"आरक्षण महायुतीने दिले महाविकास आघाडीने ते टिकवले नाही. मी शपथ घेतली. आम्ही स्पेशल अधिवेशनात बोलावले. हायकोर्टात कोण गेलाय आरक्षण रद्द करायला याबाबत तपासा. ओबीसीला मिळणाऱ्या सवलती आम्ही त्यांना देते आहोत," असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. "जारांगे पाटील एक सामाजिक कार्यकर्ता आहेत. मराठा समाज मागास आहे. त्यांना  त्याचा अधिकार मिळाला पाहिजे. शरद पवारांनी इतके वर्ष का दिले नाही आरक्षण? का एवढ्या आत्महत्या झाल्या? मराठा आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची भावना आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळणं गरजेचे आहे," असंही एकनाथ शिंदे म्हणाले. 


प्लॅन बी नाहीच


"आमच्याकडे प्लॅन बी नाहीच आम्ही बहुमताने येतोय. आम्ही विकासाचं कामावर निवडून येतोय, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला. तसेच पुढे बोलताना, काही कमी जास्त होणार नाही. बहुमत आम्हला मिळणार," असंही मुख्यमंत्री म्हणाले.