Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार बहुमताने स्थापन होत असल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असून, काही दिग्गजांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. यातील सर्वात मोठा धक्का बाळासाहेब थोरात यांच्या पराभवामुळे बसला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला असून, एका नवख्या तरुणाने विजय मिळवला आहे. अद्याप अधिकृत घोषणा होणं बाकीर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना धक्का बसला आहे. नवव्या वेळेस संगमनेर विधानसभेत निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या बाळासाहेब थोरातांचा एका नवख्या तरूणाने दारूण पराभव केला आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारा अमोल खताळ यावेळी जायंट किलर ठरला. अमोल खताळ यांनी थोरातांच्या सत्तेला सुरूंग लावला. 


अहमदनगर जिल्हा सहकाराचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथे बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटलांची पकड आहे. कधीकाळी काँग्रेसमध्ये एकत्र असणारे बाळासाहेब थोरात आणि विखे पाटील या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर होते. 


अमोल खताळ यांच्यासाठी राधाकृष्ण विखे पाटलांनी मोठी ताकद लावली होती. राधाकृष्ण विखे पाटलांच्या नियोजनबद्ध प्रचारयंत्रणेमुळे बाळासाहेब थोरातांना पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक हलक्यात घेणं त्यांना महागात पडलं. माझ्या विरोधात खोटा प्रचार करणा-या बाळासाहेब थोरातांच्या दहशतीचं झाकण जनतेनं उडवलं अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. 


2019 मधील विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या साहेबराव नवले यांचा पराभव केला होता. बाळासाहेब थोरात यांना 1 लाख 25 हजार 380 मतं मिळाली होती. तसंच साहेबराव नवले यांना 63 हजार 128 मतं मिळाली होती.