Maharashtra Assembly Election: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरुन नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबतचा निर्णय अद्यापही अंतिम झाला नसल्याने तिन्ही पक्षांमध्ये चर्चा आणि वादविवाद सुरूच आहेत. जागावाटपावर सहमती न झाल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या घटक पक्षांमध्ये एकमत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या अनिश्चिततेच्या काळात काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळून येताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसमधील काही मोठ्या नेत्यांनी छुप्या बैठकांचा सिलसिला सुरू केला आहे. या बैठकींमध्ये पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून मुख्यमंत्रिपद किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. यामुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष आणि मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जास्तीत जास्त जागांवर लढावे, यासाठीही या नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे.


लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झालं आहे. विधानसभा निवडणुकीत याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी करत आहे. काँग्रेस नेत्यांनी इच्छुक उमेदवारांची चाचपणी पूर्ण करत त्यांच्या यादीवर अंतिम निर्णय घेण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल आणि नंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती पक्षातील सूत्रांकडून मिळाली आहे.


या बैठकींमध्ये काही वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा करण्याबरोबरच मंत्रिपदांची मागणीही केली आहे. इच्छुक उमेदवारांना समर्थन देण्यासाठी काही नेते मंडळींनी त्यांना महामंडळे किंवा समित्यांमध्ये पदे मिळवून देण्याचे आश्वासन दिले असल्याचेही समजते. पक्षांतर्गत या बैठकींनी गटबाजीला आणखी चालना दिली आहे.


दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनाही या गटबाजीची माहिती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यामुळे काँग्रेसला अंतर्गत गटबाजीवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. जर या अंतर्गत मतभेदांवर लवकरच तोडगा काढला गेला नाही, तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.