Ajit Pawar on Maharashtra Assembly Election: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election) तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दिवाळीनंतर किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होतील असे अंदाज वर्तवले जात आहेत. दरम्यान दुसरीकडे 'एक देश, एक निवडणूक' (One Nation One Election) प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने निवडणुका लांबण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. 15 दिवसांत आचारसंहिता लागेल असं अजित पवार म्हणाले आहेत.  ते सोलापुरात बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसची 'जन सन्मान यात्रा' सोलापूरमधील मोहोळ शहरात दाखल झाली आहे. यावेळी अजित पवार यांच्या उपस्थितीत महिलांचा संवाद मेळावा सुरू झाला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यासह  स्थानिक नेते उपस्थित होते. 


अजित पवार नेमकं काय म्हणाले?


15 दिवसांत आचारसंहिता लागेल आणि त्यानंतर निवडणूक असेल. पहिल्यासारखं सोलापूर जिल्ह्यातून महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजे. तुमचं झाल्यानंतर माढ्याला जाऊन तिथेही हेच सांगणार आहे असं अजित पवार म्हणाले आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी अजित पवारचा दौरा रद्द करणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे. तुम्ही काळजी करू नका, मी फार स्पष्ट आहे असंही ठणकावून सांगितलं. 


"यापुढे मोहोळकरांना कोणत्याही निधीची कमतरता भासू देणार नाही. सर्वांनी भरभरून पाठिंबा आणि आशीर्वाद दिले. मिळालेल्या पदाचा आणि संधीचा वापर करु. जनतेचा विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्न करत असतो. आपण लोकांशी लबाडी करायची नाही, फसवायचं नाही," असं अजित पवार म्हणाले आहेत.


"सरकारमध्ये काम करण्याकरता गेलो आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये अडीच वर्षे होतो, तेव्हा विचारधारा सोडली नाही. आपण सेक्युलर विचारधारा सोडली नाही. सर्व जाती-धर्माच्या लोकांना आवाहन आहे, कोणतीही जात धर्म एकमेकाचा आकस करत नाही. महाराष्ट्रात काही लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहात," असंही ते म्हणाले.
 
पुढे ते म्हणाले, "गरिबाला दीड हजाराची किंमत माहिती आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्याला काय माहिती आहे. धुणं भांडी करणारे, झोपडपट्टीत काम करणाऱ्यांना माहिती आहे. या योजनेला विरोध करणाऱ्यांना कोर्टानं धुडकावून लावलं. विरोधक सत्तेवर येतील तर ही योजना बंद करतील".