Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: राजकीय रणधुमाळीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं वक्तव्य केलं. उद्वव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) युती नाहीच  पण नेव्हर से नेव्हर अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असं सांगायलाही ते विसरले नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपची 2019 मध्ये युती तुटली. महाराष्ट्राच्या राजकारणातील सख्खे मित्र पक्के वैरी झाले. आता 2024च्या निवडणुकीनंतर युतीतले दोन मित्र परत एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. राजकीय परिस्थिती निर्माण झाल्यास उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येतील का? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत महत्वाची माहिती दिलीय. उद्धव ठाकरेंसोबत भविष्यात कधीच युती होणार नाही हे त्यांनी स्पष्टपणं सांगितलंय. पण राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हणून त्यांनी सस्पेन्स वाढवलाय.


उद्धव ठाकरेंना फडणवीसांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता त्यांनी हात जोडून जय महाराष्ट्र म्हणत शुभेच्छा दिल्यात. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्याच्या परिस्थितीत तरी उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र येण्याची शक्यता कमी असल्याचं त्यांनी सांगितलंय.


राजकारणात काहीही होऊ शकतं हे 2019 पासून महाराष्ट्र पाहतोय. वेगवेगळ्या विचाराचे पक्ष जर मित्र होऊ शकतात. तर जुने मित्रही वैर विसरुन एकत्र येतील या आशेवर दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आहेत. शिवसेना UBT आणि भाजपनं युतीचे दरवाजे बंद झाले असले तरी आशेची एक खिडकी थोडीशी उघडी ठेवलीये असं म्हटल्यास हरकत नाही.