Dilip Walse Patil on Sharad Pawar: ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते असं म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) मतदारांना दिलीप वळसे पाटलांना (Dilip Walse Patil) पाडण्याचं आवाहन केलं आहे. मंचर येथील सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी देवदत्त निकमांना आमदार बनवा असं आवाहन करताना दिलीप वळसे पाटलांवर जोरदार टीका केली. दरम्यान आता दिलीप वळसे पाटील यांनी यावर भाष्य केलं असून उत्तर दिलं आहे. भाजपासोबत सत्तेत जाण्याचा निर्णय सर्व आमदारांनी एकत्र येऊन घेतला असं ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

“भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय सर्व आमदारांनी एकत्र येऊन घेतला, त्यामुळं गद्दारीचा प्रश्न येतो कुठं?”, अशी विचारणा दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. शरद पवारांनी वळसेंच्या बालेकिल्ल्यात देवदत्त निकमांसाठी सभा घेत, गद्दारी करणाऱ्यांना आता सुट्टी नाही. वळसेंना शंभर टक्के पाडा, अशी घणाघाती टीका केली होती. त्यानंतर मौन बाळगून असलेल्या वळसेंनी अखेर गद्दारीचा शिक्का पुसण्याचा प्रयत्न केला. 


भाजपासोबत जाण्याचा निर्णय सर्व आमदारांनी मिळून घेतला, त्यामुळं हा इतका महत्वाचा विषय नाही असं स्पष्टीकरण वळसेंनी सुरुवातीला दिलं. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा हा प्रश्न विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी गद्दारी केलीच नाही, त्यामुळं गद्दारीवर बोलण्याचा प्रश्न येतो कुठं?”. 


शरद पवार नेमकं काय म्हणाले?


“आता यांनी बोलायला काय ठेवलं आहे का? त्यांनी एकचं गोष्ट ठेवली, फक्त गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. महाराजांसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना कधी सोडलं का? त्यामुळं आपल्यासोबत गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही. या गद्दारांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा,” असं शरद पवारांनी म्हटल आहे. 


'दिलीप वळसेंचा मंत्रीपदापर्यंतचा प्रवास माझ्यामुळं'


“आंबेगाव तालुक्याचं अन माझं एक अतूट नातं आहे. अगदी दिलीप वळसेंना इथून मी संधी देण्याआधी पासून माझं या तालुक्याशी संबंध येत गेलाय. दिलीप वळसेंना मी संधी दिली, ते आमदार झाले याचा मला आनंद होता. पुढं मी त्यांना मंत्री केलं. विविध पदं दिली. विश्वास ठेवला, संधी दिली. जे जे शक्य होतं, ते दिलं,” असं पवार म्हणाले.


पुढे ते म्हणाले, “ज्यांना मी पदं दिली, शक्ती दिली, अधिकार दिला, सन्मान दिला यांच्याकडून मला काही नको. आज लोक त्यांच्यावर नाराज आहेत. मंत्रिमंडळात ते गेल्यानं जनतेला हे आवडलेलं नाही. आज म्हणतात आमचे आणि पवार साहेबांचे संबंध अतिशय सलोख्याचे आहेत, असं अजिबात नाही”.