Disha Salian Case: महायुतीची सत्ता आल्यास आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? थेट नाव घेत इशारा
Disha Salian Death Case Inquiry: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर राहिलेल्या दिशा सालियनच्या मृत्यूमध्ये केवळ पाच दिवसांचा फरक होता. दोघांचा मृत्यूही अगदीच गूढ पद्धतीने झाल्याने त्यामध्ये संबंध जोडण्यात आला.
Disha Salian Death Case Inquiry: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंना इशारा दिला आहे. आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी दापोलीत घेतलेल्या सभेमध्ये सडकून टीका केल्यानंतर रामदास कदम यांनी थेट दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख करत पुन्हा महायुतीचं सरकार आलं तर आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतील असं थेट इशारा दिला आहे.
आदित्य नेमकं काय म्हणाले होते?
दापोलीमधील सभेत आदित्य ठाकरेंनी थेट कोणाचाही उल्लेख न करता, इथेही एक गद्दार आहे. तो दादागिरी करतो, रडतो असं म्हणत अप्रत्यक्षपणे रामदास कदमांवर निशाणा साधला होता. आदित्य ठाकरेंची ही टीका रामदास कदमांच्या जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. त्यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया नोंदवताना आदित्य ठाकरेंना पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास दिशा सालियन प्रकरणाची चौकशी सुरु करायला लावणार आहोत, असं सांगितलं. एवढ्यावरच न थांबता आदित्य ठाकरेंची औकदही रामदास कदमांनी काढली.
आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत साधला निशाणा
"दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेचे नाव होते. आमची सत्ता आल्यावर त्या प्रकरणाची पुन्हा चौकशी लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही," असं रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना इशारा देताना म्हटलं आहे. तसेच पुढे बोलातना आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत, "आदित्य ठाकरे रात्री 12 वाजता घराबाहेर जाऊन सकाळी पाच वाजता येतो. याचे रात्रीचे धंदे महाराष्ट्राच्या समोर यायला पाहिजेत," असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तसेच आदित्य ठाकेंचा एकेरी उल्लेख करत, "आपली औकात बघून आदित्यने बोलावं" असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
दिशा सालियन प्रकरण काय?
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियनच्या मृत्य सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच झाला होता. 28 वर्षीय दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूमध्ये केवळ पाच दिवसांचं अंतर होतं. 8 आणि 9 जून 2020 च्या रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दिशाचा एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडल्याने मृत्यू झाला. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरामध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. या दोघांच्या मृत्यूचा संदर्भ अनेकांनी जोडला. दिशाच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी तिच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करण्यात आला. तिच्या पोस्टमॉर्टमसाठी वेळ जाणूनबुजून लावण्यात आला का असा सवालही उपस्थित करण्यात आला. डोक्यावर जखम झालेल्या आणि शरीरावरील अनेक जखमांमुळे दिशाचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलं. दिशावर अत्याचार झाल्याचे कोणतेही पुरावे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सापडले नाहीत. दिशाच्या गुप्तांगावर कोणत्याही जखमा नसल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे मृत्यूपूर्वी तिच्यावर छळ झाल्याचा दावा तपास यंत्रणांनी फेटाळून लावलेला.
राणे कुटुंबाचे आरोप
नारायण राणेंबरोबर त्यांच्या दोन्ही मुलांनी अनेकदा या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचा संबंध असल्याचे आरोप केले आहेत. मात्र त्यांनी यासंदर्भात कधीच कोणतेही ठोस पुरावे सादर केलेले नाहीत. आता राणेंप्रमाणेच रामदास कदमांनीही आदित्य ठाकरेंचं नाव या प्रकरणात होतं याचा उल्लेख केला आहे.