Eknath Shinde Resigned As Chief Minister Of Maharashtra: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदेंनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंनी राजीनामा सुपूर्द केला आहे. राज्य सरकारचा कार्यकाळ आज संपणार आहे. 26 नोव्हेंबर ही विद्यमान विधानसभेच्या कार्यकाळाची शेवटची तारीख असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र नवे मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत राज्याचा कारभार शिंदेच पाहणार आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते नवं सरकार स्थापन होईपर्यंत कारभार संभाळणार आहेत. 


...अन् शिंदेंनी राजीनामा दिला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना विधानसभेचा पंच वार्षिक कार्यकाळ संपलेला आहे. विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने तांत्रिक बाब म्हणून यासाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरच विधानसभा बरखास्त होते. मुख्यमंत्री सकाळी 11 वाजता राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील अशी माहिती समोर येत होती. त्याप्रमाणे सकाळी साडे दहापासूनच घडामोडींना सुरुवात झाली. सर्वात आधी 'देवगिरी' बंगल्यावरुन अजित पवार निघाले आणि राजभवनामध्ये दाखल झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या 'सागर' बंगल्यावरुन राजभवनावर दाखल झाले. सर्वात शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवानात दाखल झाले. तिन्ही नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर शिंदेंनी राजीनामा दिला. शिंदेंनी राजीनामा दिल्याने आता पुढील सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून ही तांत्रिक बाब असली तर सत्ता स्थापनेसाठी फार महत्त्वाची घडामोड आहे.


नक्की वाचा >> राजकीय घडामोडींना वेग! रात्री 12.53 AM ला CM शिंदेंची पोस्ट; म्हणाले, 'अशा पद्धतीने माझ्या...'


'हा' नेता ठरवणार पुढचा मुख्यमंत्री कोण


भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीमध्ये 132 जागांवर विजय मिळवला असून शिंदेंच्या शिवसेनेनं 57 जागांवर विजय मिळवला आहे. अजित पवारांच्या पक्षाने 41 जागांवर विजय मिळवला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाशी बोलून आम्ही योग्य तो निर्णय घेऊन असं एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेळोवेळी सांगितलं आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे निश्चित होणार असून उद्या म्हणजेच बुधवारी मुख्यमंत्री पदी कोण असेल याची घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच मुख्यमंत्री कोण असेल यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. आज किंवा उद्यापर्यंत मुख्यमंत्री पदासंदर्भात निर्णय घेऊन नाव जाहीर केलं जाईल असं सांगितलं जात आहे. 


नक्की वाचा >> निवडणुकीनंतरचा राज्यातील सर्वात मोठा निर्णय! गृह खात्याने...; फडणवीसांची 'ती' भेट कारणीभूत


मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच


मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडूनही जोर लावला जात असल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच कायम रहावेत असं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी मागील दोन दिवसांमध्ये वेगवगेळ्या प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. यामध्ये दीपक केसरकर, संजय शिरसाट यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घ्यावी असं भाजपाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं भाजपा नेत्यांनी बोलून दाखवलं आहे. त्यामुळे नवीन मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलची उत्सुकता कायम आहे.