`प्रमोद महाजनांची हत्या पैशांसाठी नाही, हे मोठं षडयंत्र`; पूनम महाजनांचा खळबळजनक दावा
Poonam Mahajan On Promod Mahajan Murder Is Big Conspiracy: प्रमोद महाजन यांच्यावर त्यांचे सख्खे बंधू प्रवीण महाजन यांनी 2006 साली राहत्या घरात गोळ्या झाडून हत्या केली होती. याचसंदर्भात आता 18 वर्षानंतर प्रमोद महाजनांच्या लेकीने खळबळजनक दावा केला आहे.
Poonam Mahajan On Promod Mahajan Murder Is Big Conspiracy: भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते प्रमोद महाजनांची हत्या मोठं षडयंत्र होतं ते कधीतरी बाहेर येईलच, असं विधान त्यांची कन्या आणि भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार पूनम महाजन यांनी 'झी 24 तास'च्या 'जाहीर सभा' कार्यक्रमामध्ये केलं आहे. 'प्रमोद महाजनांची हत्या पैशांसाठी किंवा मत्सरापोटी झाली नाही. हत्येमागे कौटुंबिक कारण नाही,' असंही पूनम महाजन यांनी म्हटलं आहे. प्रमोद महाजनांच्या हत्येनंतर जवळजवळ दोन दशकांनंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य सविस्तरपणे बोलले होते. महाजन यांचे सख्खे बंधू प्रविण महाजन यांनी 2006 मध्ये राहत्या घरी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती.
पूनम महाजन यांना काय प्रश्न विचारण्यात आला?
18 वर्षानंतर देशातील या सर्वात मोठ्या हायप्रोफाइल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. "हे सगळं घडलं ते घरात घडलं. मोठ्या भावावर गोळ्या झाडल्या गेल्या घरात त्यामुळे त्यावेळी त्याची अधिक चर्चा झाली. ते किती ट्रॉमॅटिक होतं? कारण सख्खा काका आपल्या वडिलांवर गोळ्या झाडतो," असं म्हणत 'झी 24 तास'चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी 'जाहीर सभा' कार्यक्रमात पूनम महाजन यांना विचारला.
"आज, उद्या किंवा परवा कधीतरी कळेल हे..."
या प्रश्नाला उत्तर देताना, "कोणी झाडली गोळी काय... ती गोळी फक्त एका माणसाच्या रागाची, मत्सराची नव्हती. राग आणि मत्सर होता कारण त्या गोळीचे पैसे सुद्धा माझ्या वडिलांनीच दिले होते. त्या बंदुकीचे पैसे सुद्धा माझ्या वडिलांनीच दिले होते. पैसे इतके होते की तुम्ही कोर्ट केसही लढू शकला होता. तुम्ही आयुष्यही घालवू शकला होता. पण ती गोळी एका माणसाच्या रागाची आणि मत्सराची नव्हती. मी नेहमी म्हणते की त्यामागे मोठं षडयंत्र होतं. आज, उद्या किंवा परवा कधीतरी कळेल हे षडयंत्र काय होतं. त्यामधून कळेल हे का झालं. दोन भावांमध्ये भांडण काहीच नव्हतं. जेव्हा एक देतो आणि दुसरा घेतो त्यात भांडण काहीच नसतं. मला परत या गोष्टीवर जास्त बोलायचं नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगते, याच्यामागे फार मोठं षडयंत्र आहे," असं पूनम महाजन म्हणाल्या.
फक्त काही पैशांसाठी? की त्या पैशाच्या नावामागे कोणीतरी हा अभ्यास केला होता की आपण या पद्धतीने हा विचार दाबू शकू? त्याच्या मागे एक फार मोठं षडयंत्र होतं," असंही पूनम महाजन म्हणाल्या.