Maharashtra Assembly Election Kolhapur North Satej Bunty Patil: विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी मिळालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार मधुरीमाराजे (Madhurima Raje) यांनी अचानक शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने नाट्यमय घडामोडींची मालिका सोमवारी पाहयाला मिळाली. मधुरीमाराजे यांनी अर्ज मागे घेणं हा काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व असलेल्या सतेज पाटलांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मधुरीमाराजे यांच्या उमेदवारीवरुन घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांशी बोलताना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र आज पत्रकारांशी संवाद साधताना सतेज पाटलांनी हसत हसत या सर्व नाट्यमय घडामोडींवर प्रतिक्रिया नोंदवली. अगदी मित्रपक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं ही जागा मागितली होती या संजय राऊतांच्या दावाव्यवरही त्यांनी भाष्य केलं आहे. 


माघार घेतल्यासंदर्भात काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"कालच्या विषयावर पडदा टाकायचा मी निर्णय घेतला आहे. जे घडलं आहे त्यावर बोलण्याची काही आवश्यकता वाटत नाही. पुढे कशापद्धतीने जावं याच्या चर्चा महाविकास आघाडी म्हणून सर्वांशी करणार आहे. परवा आमचं ठरलं होतं की इंडिया आघाडीचे घटकपक्ष भेटतील. म्हणून आज आम्ही भेटलो. लोकसभेमध्ये इंडिया आघाडीत प्रचंड ताकदीने राबले होते. सर्वांनी मदत करावी अशी अपेक्षा आहे. आज संध्याकाळपर्यंत आमची दिशा निश्चित करु," असं सतेज पाटील यांनी पत्रकारांशी चर्चा करताना म्हटलं आहे. तसेच, "पुढचे 15 दिवस मला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. ही माझी जबाबदारी आहे," असंही सतेज पाटील म्हणाले. 


राऊतांच्या दाव्यावरही दिलं उत्तर


कोल्हापूर उत्तरची जागा वारंवार मागितली होती, असं संजय राऊत म्हणाले आहे असा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना सतेज पाटलांनी, "मला कुठलीही कॉन्ट्राव्हर्सी करायची नाही. झालं एवढं भरपूर आहे. आता पुढे जाणं महत्त्वाचं आहे. घडलेल्या गोष्टी सर्वांसमोर आहेत. यावर मी बोलणं योग्य नाही. पुढची दिशा शिवसेना, राष्ट्रवादी आणि इंडिया आघाडी म्हणून स्पष्ट होईल. छत्रपती शाहू महाराजांशी देखील मी चर्चा केलेली आहे. त्यांना विश्वासात घेऊन जो निर्णय होईल तो नक्की घेऊ," असं सतेज पाटील म्हणाले.


नक्की पाहा >> ...अन् सतेज पाटील कार्यकर्त्यांसमोर ढसाढसा रडले! कोल्हापूरमधील राड्यानंतरचा Video पाहाच


आज सतेज पाटील उद्धव ठाकरेंबरोबर 


उद्धव ठाकरेंच्या आजच्या कोल्हापूर दौरऱ्यासंदर्भात बोलताना, "मी उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठीच एअरपोर्टला निघालेलो आहे. तिथून अंबाबाईचं दर्शन करणार आहोत आणि मग सभेच्या ठिकाणी जाणार आहोत," असं सतेज पाटलांनी सांगितलं. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात जिथं जिथं शक्य आहे तिथे उमेदवार माघार घेण्यासाठी आम्हाला यश आलं आहे, असंही सतेज पाटलांनी सांगितलं.