बिनशर्त परतफेडीचा फॉर्म्युला ठरला? सरवणकरांचे माघार घेण्याचे संकेत; त्या मोबदल्यात मनसे...
Maharashtra Assembly Election Mahim Constituency: सदा सरवणकरांनी पत्रकारांशी बोलताना अगदी भाजपा अमित ठाकरेंचा प्रचार करण्यापासून ते पुर्नसवसनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही ऑफर दिली का याबद्दलच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
Maharashtra Assembly Election Mahim Constituency: मुंबईतील माहीम मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उमेदवार सदा सरवणकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंविरोधातील उमेदवारी मागे घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंतचा वेळ आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर काही वेळापूर्वी बोलणं झालं असून पक्ष हिताच्या दृष्टीने आपली एक मागणी मनसेनं मान्य केली असल्याने पदाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय जाहीर करु असं सूचक विधान सरवणकरांनी केलं आहे. सरवणकरांनी मुंबईमधील मतदारसंघांसाठी मनसे आणि महायुतीमध्ये समजोता झाल्याचं सांगितलं आहे. म्हणजेच या माध्यमातून लोकसभेला राज ठाकरेंनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याच्या मोबदल्याचा फॉर्म्युला ठरल्याचं सूचित करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्र्यांबरोबर फोनवरुन चर्चा
मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सरवणकरांनी, "मुख्यमंत्र्यांचा 10 मिनिटांपूर्वी फोन आला होता. तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तोपर्यंत तुझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलून काय तो निर्णय कळवलं असं सांगितलं. मुंबईमध्ये महायुतीविरोधात मनसेच्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा अशी माझी अट होती. महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून यावेत ही आमची मागणी होती. धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे विचार विधानसभेत जावे अशी इच्छा आहे. मनसे उमेदवार मागे घेण्यास तयार आहे," असं सरवणकरांनी सांगितलं. "मी मतदारांची मागणी मान्य करुन, शिंदे साहेबांची इच्छा मान्य करुन कार्यकर्त्यांशी आणि माझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलून योग्य तो निर्णय वेळीच जाहीर करेन," असं सरवणखरांनी सांगितलं आहे. सध्या माहिममध्ये माझ्यासाठी 50 ग्रुप प्रचार करत फिरत आहेत. आम्ही आता चर्चा करु आणि काय ते ठरवू असं सांगत सरवणकरांनी माघार घेण्यासंदर्भातील सूचक विधान केलं आहे.
मी ही निवडणूक प्रतिष्ठेची न करता
"महायुतीच्या विरोधात सर्व उमेदवार मागे घ्यावीत अशी माझी अट आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदे व्हावेत अशी मागणी. मनसेमुळे आमच्या उमेदवारांची मतं कमी होणार असतील तर मी ही निवडणूक प्रतिष्ठेची न करता पक्षच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेणं गरजेचं आहे," असं सूचक विधान सरवणकरांनी केलं आहे. "एका सीटमुळे सर्व वातावरण खराब व्हावं असं वाटत नव्हतं. राजसाहेबांबद्दल आमच्या मनात प्रेम आहे. महायुतीचे आमदार वाढावे अशी इच्छा आहे. कार्यकर्त्यांना डावलून निर्णय घेता येणार नाही. तू तुझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलून घे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. संघटनेच्या हितासाठी अशाप्रकारचा त्याग केलेला आहे. एका आमदारकीसाठी अडकून राहणं हे संयुक्तिक होणार नाही. मी अर्ज मागे घेणार नाही. त्यांना आपल्या पक्षाचं हीत, राज्याचे मुख्यमंत्री या साऱ्याचा विचार करावा लागेल. मुख्यमंत्र्यांच्या भावाना मी तुमच्यापर्यंत कळवल्या. त्याचं उत्तर कार्यकर्त्यांशी बोलूनच देता येईल," असं म्हणत सरवणकरांनी केवळ माघार घेण्यासंदर्भातील शिक्कामोर्तब बाकी असल्याचं सूचक विधान केलं.
नक्की वाचा >> Maharashtra Assembly Election: ...तर मला अटक करतील; जाहीर सभेत CM शिंदेंनी व्यक्त केली भीती
भाजपा अमित ठाकरेंचा प्रचार करणार यावर सरवणकरांची पहिली प्रतिक्रिया
"मी अर्ज मागे घ्यावा अशी भावना आहे. मात्र कार्यकर्त्यांचा कसा प्रस्ताव मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. आम्ही कार्यकर्त्यांचं नेतृत्व करणारे नेते आहोत," असं सरवणकर म्हणाले. विशेष म्हणजे भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी अमित ठाकरेंचा प्रचार करणार असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला असता सरवणकरांनी, "राजसाहेबांशी अनेकांचे कौटुंबिक संबंध आहेत. या प्रेमापोटी ते असा उल्लेख करत आहेत. पक्ष म्हणून फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट आहे," असं उत्तर दिलं. "मनसेनं आपल्याविरोधातील सर्व उमेदवार मागे घ्यावेत. ते उभे केले तर आपल्या आमदारांची संख्या मोठ्याप्रमाणात कमी होऊ शकते. मुख्यमंत्री पुन्हा शिंदे व्हावेत अशी मांडणी आम्ही करतोय. त्यांनी कधीच उमेदवारी मागे घ्यावी असं सांगितलं नव्हतं," असं सरवणकरांनी स्पष्ट केलं आहे.
नक्की वाचा >> Maharashtra Election: प्रचार, मतदानाआधीच फडणवीसांना मुंबईत मोठं यश; BJP चा मार्ग सुखकर
माघार घेतल्यास ऑफर काय?
माघार घेतल्यास पुर्नवसनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासन दिलं आहे का? असं विचारलं असता सरवणकरांनी, "मी अपेक्षेने किंवा काही मिळेल म्हणून माघार घेतली नाही. राज्यात महायुतीचं सरकार आलं पाहिजे. जेव्हा मोठे निर्णय घेतो त्यावेळेस एखादा बळी जातो. मी जातो असं म्हटलं होतं. माझा गेला असं म्हटलेलं नाही," असं म्हटलं.