`सरकार स्थापन करण्यासाठी...`; निकालाआधीच प्रकाश आंबेडकरांनी नेमका कोणाचा डाव उधळला?
Maharashtra Assembly Election Prakash Ambedkar: मतदानानंतर 20 तारखेच्या संध्याकाळीच एक्झीट पोलची आकडेवारी समोर आली असून महाविकास आघाडी आणि महायुतीपैकी कोणाच्या बाजूने कल जाणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Maharashtra Assembly Election Prakash Ambedkar: विधानसभा निवडणुकीनंतर एक्झिट पोलमध्ये सत्ताधारी महायुतीमध्ये आणि विरोधक महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर असेल असं स्पष्ट झालं आहे. अनेकांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला असला तरी दोन्ही गटांमध्ये अटीतटीची लढाई होईल अशीच शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच अपक्ष आणि इतर पक्षांच्या संभाव्य विजेत्या उमेदवारांबरोबर संपर्क साधला जात असल्याची चर्चा आहे. महायुतीमधील भारतीय जनता पार्टी, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकीकडे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष वगळता इतर पक्षांच्या उमेदवारांशी संपर्क साधून आकड्यांची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच तिसऱ्या आघाडीची मोट बांधणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका एक्झिट पोल आणि सर्वांचेचे अंदाज चुकवू शकणारी आहे.
महायुतीच्या बाजूने कल पण...
राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीशिवाय ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासहीत संभाजी राजे छत्रपती आणि इतर नेत्यांनी एकत्र येत तिसरी आघाडी उभारुन निवडणूक लढली. अनेक ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी उमेदवार दिले. मात्र सरासरी 20 आमदार हे महाविकास आघाडी किंवा महायुतीमधील नाही तर अपक्ष अथवा अन्य पक्षातील असतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.
महायुतीच्या बाजूने कल दाखवण्यात आला असला तरी अटीतटीची लढाई असेल असं मानलं जात आहे. त्यातच आता ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपली आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट केली आहे.
नक्की वाचा >> महाराष्ट्रात खळबळ उडवणारी बातमी! '25 नोव्हेंबरला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील'; मोठा दावा
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
"जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंत करणार," असं आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे. शनिवारी, 23 नोव्हेंबर रोजी राज्यात मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या स्पष्ट होणार आहे. वंचित बहुजन आघाडी या वेळी अनेक ठिकाणी जिंकण्याच्या स्थितीत असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सत्तेत जाणार असे म्हटले आहे.
आपल्या या भूमिकेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन्ही पर्याय खुले ठेवल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ही भूमिका घेत निकालाआधीच प्रकाश आंबेडकरांनी नेमका कोणाचा डाव उधळला हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.