बाळासाहेबांवरुन राज ठाकरेंनी डिवचलं! राऊतांकडून मोजून 9 शब्दात उत्तर; म्हणाले, `राज ठाकरे काय...`
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024, Sanjay Raut On Raj Thackeray: राज ठाकरेंनी दिंडोशीमधील जाहीर सभेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याचा संदर्भ देत संजय राऊतांना पत्रकारांनी प्रश्न विचारला.
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024, Sanjay Raut On Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिंडोशीमध्ये झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीर सभेमध्ये मनसेचेअध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या सभांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नावही घेतलं जात नाही, असा टोला लगावत राज यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. या टीकेवरुन संजय राऊत यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवताना राज ठाकरेंना सुनावलं आहे.
राज नक्की काय म्हणाले?
दिंडोशीमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. "बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे आहे?" असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. "बाळासाहेबांचे फोटो लावून उद्धव ठाकरे मतं मागतात. उध्दव ठाकरे पंजाचा प्रचार करतात. काँग्रेस, पवार गट बाळासाहेबांचं नावही घेत नाही," असा टोला राज यांनी लगावला. याचाच संदर्भ देत राऊत यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये उत्तर दिलं. "महाविकास आघाडीच्या सध्या सभा होत आहेत. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे पण त्यांचं नावही घेतलं जात नाही अशी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते पंजाचा प्रचार करत असल्याचंही राज ठाकरे म्हणाले आहेत," असं सांगत राऊतांना यावर काय म्हणायचं आहे हे पत्रकारांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या मनात नक्की काय आहे हे
हा प्रश्न ऐकून संजय राऊत यांनी, "राज ठाकरे काय म्हणतात त्याला महाराष्ट्रात काही किंमत नाही," असं खोचक उत्तर दिलं. पुढे बोलताना राऊत यांनी, "मोरारजी देसाईनंतर महाराष्ट्र आणि गुजरातच एकाच वेळी नेतृत्व त्यांना करायचा आहे. मात्र त्यांच्या पक्षाला महाराष्ट्रात फारसं स्थान आहे असं मला वाटत नाही. मोरारजी देसाईनंतर राज ठाकरेच. महाराष्ट्राच्या आणि मराठी अस्मितेच्या स्वाभिमानाबद्दल त्यांच्या मनात नक्की काय आहे हे आमच्या शंका कायम राहिली. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा प्रचार करत आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवारांची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. हे दोन्ही पक्ष आणि नेते ज्या संघर्षात उतरलेत तो स्वत:च्या स्वार्थासाठी नसून ज्या पद्धतीने गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राची लूट चालवली आहे त्याविरुद्ध आहे," असं उत्तर दिलं.
नक्की वाचा >> शिंदे एका तासासाठी 15-16 बॅग कपडे नेतात? राऊतांचा सवाल; म्हणाले, '25-25 कोटी...'
व्यापाऱ्यांविरुद्ध त्यांची लढाई
"दोन स्वाभिमानी पक्ष त्यांनी फोडले. हे महाशय त्यांच्या बाजूने उभे आहेत. हे दुर्देवी आहे. ते खूप महान नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला फार काही बोलायचं नाही. एवढं सांगेन की उद्धव ठाकरेंवर टीका करताना थोडसं भान ठेवा. ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेतच पण महाराष्ट्रावर डल्ला मारणाऱ्या, हल्ला करणाऱ्या गुजरातच्या दोन खतरनाक व्यापाऱ्यांविरुद्ध त्यांची लढाई सुरु आहे," असंही राऊत म्हणाले.