Maharashtra Assembly Election: मधल्या काळात जे ग्रहण लागलं होतं, त्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी हात जोडून माफी मागत आहे. माझ्याकडून चूक झाली होती असं उद्धव ठाकरे जाहीर मंचावरुन म्हणाले आहेत. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची पहिली जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी येथील विजयाची जबाबदारी आता सतेज पाटील यांच्यावरच टाकली आहे असं सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मधुरीमाराजे (Madhurima Raje) यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने काँग्रेसची (Congress) नाचक्की झाली होती. दरम्यान आज उद्धव ठाकरे यांची पहिली सभा कोल्हापुरात पार पडली असून विजयाची जबाबदारी सतेज पाटील (Satej Patil) यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. राधानगरी मतदारसंघ गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही असंही त्यांनी सांगितलं. 


"मधल्या काळात जे ग्रहण लागलं होतं, त्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी हात जोडून माफी मागत आहे. माझ्याकडून चूक झाली होती. पण तुम्ही फार मोठ्या मनाचे आहेत. त्याला सगळं काही दिलं, आमदार केलं, तुम्ही माझं ऐकलं होतं. पण सगळं काही देऊनही तुमच्या पाठीवर वार करुन आता छातीवर वार करण्यासाठी उभे राहिले आहेत. आमदारकी, मान सन्मान, प्रेम सगळं काही दिलं. शिवसेना नावाच्या आईवर वार करणारा माणूस तुमचा होऊ शकतो का? पण सतेज पाटील सोबत आहेत याचा आनंद आहे. येथील विजयाची जबाबदारी आता सतेज पाटील यांच्यावरच टाकली आहे," असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. 


"अडीच वर्षं भोगत आलो ते आज मांडायला आलो आहे. जिथं मिळेल तिथे खायला यांनी सुरुवात केली. प्रकल्पाच्या नावाखाली कंत्राटदार यांचे खिशे भरायचं काम सरकार करत आहे. निवडणूक जवळ आल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण दिसली. बदलापूरमधील त्या चिमुकलीच्या आईला तुम्ही 1500 देऊन समजवून सांगणार आहात का? 1500 रुपये देऊन कुणाचं घर चालतं हे सांगावं," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. 


"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी घाईघाईने पुतळा उभारून महाराजांचा अवमान केला. 
आम्ही केवळ पुतळे उभा करणार नाही तर शिवाजी महाराज यांचं मंदिरं उभं करू," असं उद्धव ठाकरे म्हणाले.