Exclusive:`बहिणीने भावाकडे काही मागायचं...` भाऊबीजेच्या आधी अजित दादांबद्दल काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
Supriya Sule On Ajit Pawar: `अजित पवारांना घर फुटल्याविषयीच्या वेदना होतात का? याची मला माहिती नाही. लोकशाही आहे ते त्यांच मत व्यक्त करू शकतात,` असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Supriya Sule On Ajit Pawar: सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगत यावेळी पाहायला मिळणार आहे. यातही बारामतीच्या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर विधानसभेत पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या लढतीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. आता विधानसभेला अजित पवार यांच्यासमोर युगेंद्र पवार यांचे आवाहन असणार आहे. यावेळी कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. दिवाळीत संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येतं. यावेळची भाऊबीज कशी असणार? याबद्दलही सर्वांच्या मनात उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याबाबत महत्वाचे विधान केले आहे. झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या.
'अजित पवार माझा फोन घेत नाहीत.'
'अजित पवारांना घर फुटल्याविषयीच्या वेदना होतात का? याची मला माहिती नाही. लोकशाही आहे ते त्यांच मत व्यक्त करू शकतात,' असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 'उत्तरं मलाही देता येतात, पण माझं पोट खूप मोठं आहे. माझ्या आईने दिलेली ताकद माझ्यासोबत आहे. गप्प राहायला आणि सहन करायला खूप ताकद लागते. एक महिला म्हणून ती माझ्याकडे उपजत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभेवेळी माझ्यावर रोज वार होत होते. पण मी उत्तर दिलं नाही. माझी लढाई वैचारिक आहे. राजकारण, विचार आणि नाती यात मी गल्लत करत नाही. मी माझ्याकडून कौटुंबिक संबंध जपले आहेत. अजित पवार माझा फोन घेत नाहीत. पार्थ आणि जय मला माझ्या मुलांसारखे' असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक ही फक्त जिंकण्यासाठीच लढली जात नसते. त्यामागे काहीएक विचारही असतो.युगेंद्रने गेल्या काळात खूप कष्ट घेतले. निवडणूक लढण्याची त्याची इच्छा होती. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचे त्या म्हणाल्या.
99% कुटुंब माझ्यासोबत अजित पवार फक्त...
माझ्या कुटुंबात 99% कुटुंब माझ्यासोबत आहे. एक अजित पवार फक्त माझ्या विरोधात बोलत होते. मी सुनेत्रा पवारांना कधीच विरोध करत नाही. माझी लढाई भाजप विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले.
माझे एकूण 8 भाऊ
बहिणीने भावाकडे काही मागायचं असतं असं नाही. तिच्यासाठी त्याचं प्रेम खूप मोलाचं असतं. अजित पवार हे एकटेच माझे भाऊ नाहीत. माझे वडिलांकडचे सहा आणि आईकडचे दोन असे एकूण आठ भाऊ आहेत. मी कुणाबरोबरच कटुता ठेवत नाही. मला वडिलांनी कुठलंच पद दिलं नाही, याबद्दल अजिबात दुःख नाही. आई-वडिलांनी मला जन्म दिला, शिक्षण दिलं, प्रेम दिलं... माझ्या संपूर्ण कुटुंबांनी मला प्रेम दिलं. हे माझ्यासाठी कुठल्याही पद आणि अधिकारांपेक्षा महत्त्वाच असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आबांबाबतच वक्तव्य वेदनादायी
अजित पवार यांनी आर आर पाटील यांच्याबद्दल विधान केलं होतं. यावरदेखील सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आर आर आबा जाऊन 9 वर्षे झाली. आज अजित पवार यांच्या विषयी बोलत असतील तर ते खूप वेदनादायी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या अधिकारात अजित पवारांना सिंचन घोटाळ्याची फाईल दाखवली? असा प्रश्न उपस्थित करत तो गुन्हा आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.आम्ही निवडणुकीत जय पराजयाचा विचार करत नाही. प्रत्येक जण परीक्षेला पास होण्यासाठी बसत असतो. कोणाचातरी एकाचा विजय होणार, असे सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितले.