Maharashtra Assembly Election: "अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी शौर्याचा व स्वाभिमानी बनण्याचा कितीही आव आणि ताव मारला तरी ते मोदी-शहांचे गुलाम आहेत. ही सगळी माकडं आहेत व त्यांचे मदारी तिकडे गुजरातमध्ये बसले आहेत. तसे नसते तर अजित पवार यांनी अदानींवर केलेल्या वक्तव्याबाबत चोवीस तासांत ‘यूटर्न’ म्हणजे पलटी मारली नसती," असा टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लागावला आहे. "सरकार पाडापाडीच्या खेळासंदर्भात जी बैठक झाली त्या बैठकीस फडणवीस वगैरे लोकांसोबत स्वतः अदानी शेठ हे उपस्थित असल्याचा स्पष्ट उल्लेख पवारांनी केला व महाराष्ट्राच्या राजकारणावर मोदी-शहा व अदानी यांचा कसा पगडा आहे ते स्पष्ट केले. पण पुढच्या चोवीस तासांत अजित पवार यांनी घूमजाव केले व आपल्या वक्तव्यातून अदानी शेठचे नाव वगळले. आता अजित पवार सांगत आहेत, “त्या बैठकीस अदानी शेठ उपस्थित नव्हते.’’ दिल्ली-गुजरातमधील भाजप शेठ मंडळींचा बांबू आल्यामुळे अजित पवारांना माघार घ्यावी लागली. अजित पवार त्यांच्या भाषणात वगैरे नेहमी सांगतात, मी कुणाच्या बापाला भीत नाही. मी नेहमी खरेच बोलतो. पण अजित पवार यांची सध्याची अवस्था व चेहरा पाहता त्यांचे हे बोलणे खरे नाही," असंही ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.


उद्योगपतींची दलाली करणारे सरकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"शिंदे-अजित पवार यांचे मदारी डमरू वाजवतात व त्याबरहुकूम हे उड्या मारतात. हे महाराष्ट्राची जनता पाहात आहे. भाजपचे राजकारण हे पैसेवाल्यांचे राजकारण आहे. जे आमच्या विचारांचे नाहीत त्यांना पैशाच्या बळावर आम्ही विकत घेऊ शकतो हा त्यांचा माज महाराष्ट्राला खड्ड्यात घालताना दिसत आहे," असा टोला 'सामना'च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. "शिंदे व अजित पवार यांचा असा दावा होता की, फार मोठ्या उदात्त विचारांमुळे त्यांना आपापले पक्ष सोडावे लागले. शिंदे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी फारकत घेतली हे सहन झाले नाही.’’ पण गौतम अदानी हे त्यांचे नवे हिंदुहृदयसम्राट आहेत काय? की या श्रीमंत हिंदुहृदयसम्राटांच्या मार्गदर्शनाखाली बैठका घडवून शिवसेना फोडण्याबाबत, महाराष्ट्रातील सरकारे उलथवण्याबाबत निर्णय झाले? राज्यात अदानी, लोढा, आशर वगैरे बिल्डर व उद्योगपतींची दलाली करणारे सरकार सत्तेवर बसवले आहे. महाराष्ट्र सरकारच्या चाव्या अदानी शेठच्याच हातात आहेत, हे अजित पवार यांनी सांगून टाकले. नंतर त्यांनी घूमजाव केले तरी त्यांनी सांगितले तेच खरे आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.


दीड लाख कोटी


"उद्योगपती राज्याचे दुश्मन नसतात, पण अदानी शेठसारखे उद्योगपती महाराष्ट्रच गिळायला निघाले आहेत व त्यासाठी त्यांना त्यांचे हुकूम पाळणारे सरकार हवे आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी आमदारांना पन्नास-पन्नास कोटी रुपये देण्यात आले. हा सर्व पैसा कोणी पुरवला हे अजित पवार यांच्या गौप्यस्फोटातून समोर आले. ठाकरे सरकार पाडण्यासाठी साधारण दोन हजार कोटी रुपये खर्च झाले व त्यातला मोठा भार अदानी शेठ यांनी उचलला. मग या खर्चाची भरपाई कशी व्हायची? शेठजींनी व्यापार चालवला आहे. त्यांनी धर्मादाय कार्य सुरू केलेले नाही. रुपया लावला तर बदल्यात पाच हजारांची परतफेड व्हावी असा त्यांचा हिशोब आहे. त्यामुळे अदानी शेठने महाराष्ट्रात सरकार पाडण्यासाठी जे दोन हजार कोटी लावले त्या बदल्यात किमान दीड लाख कोटी या शेठना मिळतील व त्यासाठी मुंबईतील सर्वच भूखंड त्यांच्या घशात घातले गेले आहेत," असा खळबळजनक दावा ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.


गुंतवलेल्या पैशांची दामदुपटीने वसुली


"धारावीचे पुनर्वसन हा सगळ्यात मोठा ‘टीडीआर’ घोटाळा आहे. त्यातून भाजपचे हे शेठजी सव्वा लाख कोटी मिळवतील. शिवाय मुंबईतील मिठागरे, जकात नाके, दूध डेअऱ्यांच्या जमिनीही शेठना दिल्या. अशा पद्धतीने सरकार पाडणे, आमदार विकत घेणे या खर्चाच्या बदल्यात शेठजींना किमान दीड लाख कोटी मिळतील. या कमाईतला मोठा हिस्सा महाराष्ट्रातील निवडणुकीतही ते टाकत असतील. भाजपचा हा पैसा पुन्हा त्यांच्याकडेच पोहोचत आहे. त्यामुळे भाजपच्या राजकीय बैठकांना अदानी शेठ उपस्थित राहात असतील तर त्यात धक्कादायक असे काहीच नाही. देशाच्या कारभारात व प्रशासनात अदानी शेठचा सरळ हस्तक्षेप सुरू आहे, असेच स्पष्टपणे दिसत आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी व्हावे म्हणून अमेरिकेचे ‘अदानी’ एलॉन मस्क यांनी त्यांचा खजिना रिकामा केला. आता ट्रम्प विजयी होताच त्यांनी एलॉन मस्क यांना आपल्या मंत्रिमंडळात समाविष्ट केले. हा सरळ सरळ व्यापार आणि देवाणघेवाणच असते. त्यामुळे मस्क काय किंवा अदानी शेठ काय, गुंतवलेल्या पैशांची दामदुपटीने वसुली तर करणारच," असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.


...म्हणून गांधी गुजरात सोडून महाराष्ट्रात आले


"अदानी हे महाराष्ट्रातील राजकीय बैठकांना उपस्थित राहतात व त्यांना हवे तसे निकाल घेतात. आपल्या राज्यात हे असे कधी घडले नव्हते. उद्योगपतींचा वाढता हस्तक्षेप राज्याच्या विकासाला बाधक ठरेल, हे तर आहेच, पण राज्याची सूत्रे अदानी शेठसारख्या उद्योगपतींकडे गेल्याने त्यांच्या मनासारखे घडत नसेल तर सरकार अस्थिर करण्यासही ते मागेपुढे पाहणार नाहीत. महात्मा गांधी हे गुजरातचे. दक्षिण आफ्रिकेतून ते भारतात परत आले. गुजरातमध्ये राहिले. स्वातंत्र्य चळवळीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण गुजरातच्या भूमीवर स्वातंत्र्य लढ्याच्या दृष्टीने त्यांना थंड प्रतिसाद मिळताच त्यांनी गुजरात सोडून महाराष्ट्राकडे जाण्याचा निर्णय घेतला. ‘येथे व्यापारी मंडळ आहे. अशा लोकांना स्वातंत्र्याविषयी प्रीती नाही. त्यांना त्यांच्या व्यापारात व धंद्यातच जास्त रस आहे. येथे राहून मला स्वातंत्र्यासाठीचे कार्य पुढे नेता येणार नाही’, असे गांधींचे मत पडले व ते महाराष्ट्राकडे निघाले. जेथे प्रत्येक गोष्ट तराजू आणि पैशांवर तोलली जाते अशा लोकांच्या हाती सत्ता असेल तर देशाचा व राज्याचा बाजार होतो व व्यापारासाठी राजकारणही ताब्यात घेतले जाते. अजित पवारांनी अदानी शेठबाबतचे सत्य सांगितले व चोवीस तासांत घूमजाव केले. यामागे दाबदबावच आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यामागे शिंदे-मिंधे टोळीचा कोणताच विचार व नैतिकता नव्हती. अदानी शेठना मुंबई लुटायची आहे म्हणून महाविकास आघाडी सरकार पाडले गेले, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. या अदानी शेठचे करायचे काय? ते मऱ्हाठी जनतेने ठरवायचे आहे," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.