`हे तर लाडक्या बहिणींचे `जिहादी` भाऊ`, त्यांची...; ठाकरेंच्या शिवसेनेचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election: ‘लव्ह जिहाद’चे भूत तर ते नेहमीच नाचवीत असतात. आता लोकसभा निवडणुकीपासून ते ‘व्होट जिहाद’चे भूत नाचवीत आहेत, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Maharashtra Assembly Election: "राज्यातील सत्ताधारी ‘लाडकी बहीण’ योजनेवरून स्वतःला ‘लाडके भाऊ’ वगैरे म्हणवून घेत असतात तर विरोधकांना ‘सावत्र भाऊ’ असे संबोधत असतात. प्रत्यक्षात मात्र राज्यकर्त्यांच्याच मनात माता-भगिनींविषयी दुष्टपणा भरलेला आहे आणि त्याचा प्रत्यय त्यांचीच वाचाळवीर मंडळी आणून देत आहेत. आता भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी अशीच मुक्ताफळे उधळली असून ‘लाडकी बहीण’ योजनेचे 1500 रुपये घेणाऱ्या बहिणींना थेट धमकीच दिली आहे. ‘‘लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या बहिणी जर काँग्रेस पक्षाच्या रॅलीत दिसल्या, तर त्यांचे फोटो काढून ठेवा. त्यांची नावे लिहून ठेवा. ती आमच्याकडे द्या. आम्ही त्यांची व्यवस्था करतो,’’ अशा शब्दांत महाडिक महाशयांनी सत्ताधारी ‘लाडक्या भावां’चे खायचे दात कोल्हापुरातील एका सभेत दाखविले," असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लागावला आहे.
हा निव्वळ एक ‘व्यवहार’
"महाडिकांच्या या वादग्रस्त विधानावर अपेक्षेप्रमाणे प्रचंड टीका झाली. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर ‘पोस्ट’ टाकून माफीनामा सादर केला. मात्र माफीची मखलाशी करताना आपली ही प्रतिक्रिया ‘व्होट जिहाद’ करणाऱ्या महिलांमुळे स्वाभाविकपणे आली, अशी मल्लिनाथीही त्यांनी केली. माफी मागण्याचे नाटक तर करायचे, परंतु त्याच वेळी ओठातून बाहेर आलेले मनातले विषही नाकारायचे नाही, असाच हा प्रकार आहे. मुळात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ही योजना सत्ताधारी पक्षाने विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच जाहीर केली. 1500 रुपये घ्या आणि आम्हालाच मते द्या, हीच देवाणघेवाण राज्यकर्त्या मंडळींना लाभार्थी माता-भगिनींकडून अपेक्षित आहे. कुठल्याही बंधुप्रेमापोटी किंवा माता-भगिनींच्या काळजीपोटी ही योजना यांनी सुरू केलेली नाही. त्यांच्यासाठी हा निव्वळ एक ‘व्यवहार’ आहे," अशी टीका 'सामना'मधून करण्यात आली आहे.
‘जिहाद’ या शब्दाचे भलतेच भरते
‘‘आम्ही तुम्हाला दरमहा 1500 रुपये देत आहोत ना. मग तुम्ही फक्त आणि फक्त सत्ताधारी पक्षांच्याच रॅली, सभा, प्रचारात सहभागी व्हायचे. सत्तापक्षांनाच मते द्यायची. आमच्या योजनेचा लाभ घ्यायचा आणि विरोधी पक्षांचा प्रचार करायचा, त्यांचे झेंडे फडकवायचे, असे कसे चालेल?’’ लाडकी बहीण योजनेमागची सत्ताधारी मंडळींची खरी मानसिकता ही अशी आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी ‘लाभार्थी’ बहिणींना धमकावण्याचे कारण तेच आहे. तुम्ही जर खरंच माता-भगिनींच्या काळजीपोटी ही योजना सुरू केली असेल, तर त्यांना धमक्या का देत आहात? पुन्हा माफी मागताना ‘व्होट जिहाद करणाऱ्या स्त्रियांमुळे आलेली ही स्वाभाविक प्रतिक्रिया’ आहे, असा शिरजोरपणा का करीत आहात? सध्याच्या राज्यकर्त्यांना दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वत्र ‘जिहाद’ या शब्दाचे भलतेच भरते आलेले आहे," असा टोला ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे.
हा माफीनामा कसा म्हणता येईल?
"‘लव्ह जिहाद’चे भूत तर ते नेहमीच नाचवीत असतात. आता लोकसभा निवडणुकीपासून ते ‘व्होट जिहाद’चे भूत नाचवीत आहेत. या निवडणुकीत भाजपवाल्यांना महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात जो जबर तडाखा बसला तेव्हापासून त्यांना लागलेली ‘व्होट जिहाद’ची उचकी थांबायला तयार नाही. लाभार्थी ‘लाडक्या बहिणीं’ना बघून घेऊ असा दम भरणारे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनाही स्त्रियांच्या व्होट जिहादची उचकी लागली, तीदेखील महिलांची माफी मागताना. महाडिक यांचा हा माफीनामा कसा म्हणता येईल?" असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने उपस्थित केला आहे.
लाडक्या भावाच्या मुखवट्याआड...
‘‘लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलात ना. मग मते तर आम्हालाच द्या, विरोधकांच्या प्रचारातही दिसू नका! दिसलात तर तुमची व्यवस्था करू’’ ही ‘लाडक्या भावा’ची भाषा कशी म्हणता येईल? दहशतवाद्यांच्या तोंडी जी भाषा असते, तीच सध्या राज्यकर्त्यांच्या तोंडी दिसत आहे. त्यातूनच मिंध्यांचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे प्रचार फेरीमध्ये वृद्धाला शिवी हासडत आहेत आणि ‘‘तुला नाही पुरा केला तर नाव नाही सांगणार’’ अशा शब्दांत धमकी देत आहेत, तर कोल्हापुरात भाजपचे खासदार धनंजय महाडिक ‘‘लाडक्या बहिणींनो, विरोधकांच्या रॅलीमध्ये दिसलात तर याद राखा’’ असा दम भरत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या गरजू लाभार्थी माता-भगिनींना ‘व्होट जिहाद’च्या तागडीत ढकलत आहेत. हे लाडके भाऊ नसून लाडक्या भावाच्या मुखवट्याआड दडलेले ‘जिहादी’ भाऊ आहेत. त्यांची मानसिकता दहशतवादी आहे," असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.