Who Will Be Next CM Ramdas Athawale Revealed Name: एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी, "लवकरच मुख्यमंत्री पदासंदर्भात निर्णय घेतला जाईल," असं मत नोंदवलं आहे. असं असतानाच मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलचं गूढ कायम असताच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी 'झी 24 तास'शी बोलताना मुख्यमंत्री कोण असेल याबद्दल हायकमांडने निर्णय घेतल्याचं सांगत थेट मुख्यमंत्र्यांचं नावच जाहीर केलं आहे. 


पुढचा मुख्यमंत्री कोण? आठवलेंनी नावच सांगितलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीमध्ये सुरु असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान 'झी 24 तास'बरोबर आठवलेंनी विशेष संवाद साधला. त्यावेळेस आठवलेंना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबद्दल प्रश्न विचारण्यात आला. "महायुतीला एवढं मोठं बहुमत मिळालं आहे तरी मुख्यमंत्री कोण हे निश्चित झालेलं नाही," असा प्रश्न रामदास आठवलेंना विचारला गेला. त्यावर आठवलेंनी, "मुख्यमंत्री कोण हे ठरलं आहे. हायकमांडने देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित केलं असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत," असं उत्तर दिलं. पुढे बोलताना आठवलेंनी एकनाथ शिंदेंनी केंद्रीय नेतृत्वाकडे भूमिका मांडताना काय म्हटलं आहे हे ही सांगितलं.


शिंदेंनी केंद्रीय नेतृत्वाकडे काय मागणी केलेली?


"एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे की त्यांना अजून थोडा काळ संधी हवी आहे कारण आम्ही चांगलं काम केलं आहे. हे खरं आहे की अडीच वर्षात शिंदेंनी चांगले निर्णय घेतलं आहेत. महाराष्ट्रातील जनतेला समाधानी ठेवलं आहे. महाराष्ट्रातील विजयामध्ये शिंदेंचं मोठं योगदान आहे. देवेंद्र फडणवीसांचंही मोठं योगदान आहे. पक्षाचं म्हणणं आहे की, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलं पाहिजे," असं आठवले म्हणाले. इतक्यावरच न थांबता एकनाथ शिंदेंना केंद्रात मंत्री करण्याचा सल्लाही आपण दिल्याचं आठवलेंनी यावेळेस सांगितलं.


नक्की वाचा >> राजकीय घडामोडींना वेग! रात्री 12.53 AM ला CM शिंदेंची पोस्ट; म्हणाले, 'अशा पद्धतीने माझ्या...'


शिंदेंनी केंद्रात मंत्रिपद देण्याची मागणी


"एकनाथ शिंदेंना दिल्लीमध्ये मंत्री बनवलं पाहिजे. केंद्रात त्यांना मंत्री बनवून महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात त्यांचा उपमुख्यमंत्री असावा असा माझा सल्ला आहे. यातून लवकर मार्ग काढण्यासाठी एकनाथ शिंदेंनी मदत करण्याची गरज आहे," असं आठवले म्हणाले. 


नक्की वाचा >> निवडणुकीनंतरचा राज्यातील सर्वात मोठा निर्णय! गृह खात्याने...; फडणवीसांची 'ती' भेट कारणीभूत


...म्हणून शिंदेंनी दिला राजीनामा


दरम्यान, आज सकाळी साडेअकराच्या सुमारास एकनाथ शिंदेंनी राजभवनामध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्री पदाची जबाबदारी राज्यपाल के. पी. राधाकृष्णन् यांनी सोपवली आहे. विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने विधानसभा बरखास्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणं तांत्रिक दृष्ट्या महत्त्वाचं होतं. त्यानुसार शिंदेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला.