Maharashtra assembly Elections 2024 :  केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India Press Conference) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.  विधानसभा निवडणुकीत पिपाणी हे चिन्ह कायम ठेवलं आहे. लोकसभा निवडणुकीत याच पिपाणी चिन्हाचा मोठा फटका शरद पवार गटाला बसला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवनडणुकीत पिपाणी चिन्हावर बंदी नसणार आहे.. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पिपाणीचा पुन्हा तुतारीला फटका बसण्याची शक्यता आहे.. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं चिन्ह हे तुतारी आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत पिपाणीमुळे तुतारीला फटका बसल्याची तक्रार शरद पवार गटाने केली होती.. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागा लढवल्या होत्या..  नाशिकसह सर्वच जागांवर 4 लाखांहून अधिक मतदान पिपाणीला पडले होते. विशेषतः सातारा लोकसभेत पिपाणी चिन्हामुळे त्यांच्या उमेदवाराला पराभवाचेही तोंड पहावे लागले होते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन शरद पवार गटाने पिपाणी चिन्ह गोठवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. मात्र निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत पिपाणी हे चिन्ह कायम ठेवलंय.. तुतारी वाजवणारा माणूस लहान आणि अस्षष्ट दिसतो, त्याचा आकार वाढवण्यात यावा ही मागणी मात्र आयोगाने मान्य केलीय.


निवडणुकीत चिन्ह किती महत्त्वाचं असतं, याचा अनुभव राष्ट्रवादी शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीत आला होता... तुतारी वाजवणारा माणूस अशी शरद पवारांच्या पक्षाची अधिकृत निशाणी... मात्र याच तुतारीसारखी दिसणारं पिपाणी हे निवडणूक चिन्ह लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना देण्यात आलं... त्यामुळं राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांना मोठा फटका बसला...  


राष्ट्रवादी शरद पवार गटानं लोकसभेला 10 जागा लढवल्या... त्यापैकी 8 खासदार निवडून आले... यापैकी जवळपास प्रत्येक मतदारसंघात पिपाणी या चिन्हावरील अपक्ष उमेदवारांनी हजारो मतं खाल्ल्याचं दिसून आलं.  तुतारी आणि पिपाणीचा घोळ झाला नसता तर साता-याचा खासदारही निवडून आला असता, असं आकडेवारीवरून स्पष्ट होतंय.  साता-यात भाजपच्या उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंचा 32,771 मतांनी पराभव केला
याठिकाणी पिपाणी चिन्हावर लढलेल्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला 37 हजार 62 मते मिळाली.


दिंडोरीत तर राष्ट्रवादी उमेदवाराचं नाव आणि निवडणूक चिन्ह असा दुहेरी फटका बसला.. भास्कर भगरे हे अधिकृत उमेदवार विजयी झाले... मात्र त्यांच्या विरोधातील बाबू भगरे नावाच्या पिपाणीवाल्या अपक्ष उमेदवाराला तब्बल 1 लाख 3 हजार 632 एवढी भरघोस मतं मिळाली. माढामध्ये रामचंद्र घुतुकडे या पिपाणीवाल्या अपक्ष उमेदवाराला 58 हजार 421 मतं मिळाली. बीडमध्ये अशोक थोरात नावाच्या पिपाणीवाल्या उमेदवाराला 54,850 मतं मिळाली. बारामतीत पिपाणीवाल्या शेख सोहेल शाह नावाच्या उमेदवाराला 14917 मतं पडली. नगरमध्ये पिपाणीवाल्या गोरख आळेकरांनी 44,597 मतं घेतली. रावेरमध्ये पिपाणीवाल्या एकनाथ साळुंखेंना 43957 मतं पडली. शिरूरमध्ये पिपाणीवाल्या मनोहर वाडेकरांना 28,324 मतं. भिवंडीत पिपाणीवाल्या कांचन वाखरेंना 24, 625  मतं मिळाली. याचाच अर्थ एकूण 9 जागांवर पिपाणी चिन्हामुळे सुमारे 4 लाख 10 हजार 385 मतांचा फटका बसल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे..