Maharashtra Assembly Elections 2024 : विरोधकांच्या बॅगा तपासण्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह फडणवीस आणि अजितदादांच्या बॅगा तपासण्यात आल्या. बॅगा तपासणीचं भांडवल केलं जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. तर उद्धव ठाकरेंच्या आरोपांनंतरच सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा तपासणी सुरु झाल्याचा दावा विरोधकांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅगा तपासण्यावरुन उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्हं निर्माण केल्यानंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासण्यास सुरुवात झालीय. पालघरमध्ये प्रचारासाठी पोहचलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगा भरारी पथकाकडून तपासण्यात आल्या. अजित पवारांच्याही हेलिकॉप्टरमधील बॅगा तपासण्यात आल्या. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचीही बॅग तपासण्यात आली. फडणवीसांनी त्यांच्या बॅग तपासणीचा व्हिडिओ जाहीर करत काही लोक छोट्या गोष्टींचं भांडवल करत असल्याचा टोला फडणवीसांनी लगावलाय.


 उद्धव ठाकरेंनी आवाज उठवल्यामुळंच सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा तपासण्याचं काम सुरु झाल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी लगावलाय.बॅगा तपासण्याला विरोध नाही पण सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांची अरेरावी सुरु असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. नेत्यांच्या बॅगा तपासणं हे तसं सरकारी काम.... पण बॅगा तपासणीतून विशिष्ट पक्षांच्या नेत्यांना जावं लागल्यानं त्याविरोधात आवाज उठवला गेला. सरकारी यंत्रणांनी आपलं काम करताना एक नियम सर्वांनाच लावला असता तर आज ही वेळ आली नसती असं विरोधक बोलू लागलेत.