समर्थ रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला; अमित शाहांच्या वक्तव्यामुळे वाद
Amit Shah : प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत समर्थ रामदास स्वामींबाबत केलेलं वक्तव्य एका नव्या वादाला कारणीभूत ठरलंय.
Maharashtra Assembly Elections 2024 : समर्थ रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला, असं विधान अमित शाहांनी केलंय. सांगलीच्या शिराळ्यामध्ये अमित शाहांची प्रचार सभा पार पडली. यावेळी त्यांनी हे विधान केलंय. ही भूमी समर्थ रामदासांची पावलं पडलेली आहे, असंही ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे वाद होण्याची शक्यताये. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी अमित शाहांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतलाय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी सांगली जिल्ह्यातून विधानसभा प्रचाराला सुरुवात केली. अमित शाहांनी शिराळ्यातून प्रचाराला सुरुवात करताना भाषणाच्या सुरुवातीलाच रामदास स्वामींचा उल्लेख केला. रामदास स्वामींनी गुलामीच्या काळात तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत करुन शिवाजी महारांजांच्या मागं उभी केल्याचं सांगितलं.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस असलेल्या संभाजीराजे छत्रपतींनी अमित शाहांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केलीय. रामदास स्वामी महान असतील पण त्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध जोडू नये असं संभाजीराजे छत्रपती म्हणालेत.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही अमित शाहांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप केलाय. स्वराज्य उभारणीच्या 1642 ते 1672 या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांचा कोणताही संबंध आल्याचे पुरावे नसल्याचं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी सांगितलाय.
सांगीलीतल सभेत अमित शाहांनी शिवरायांच्या इतिहासात समर्थ रामदासांचा उल्लेख केला, हा इतिहासाचा संदर्भ चुकीचा असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी म्हंटलंय.
संभाजीनगर नामांतराला मविआ नेत्यांचा विरोध आहे. असा आरोप अमित शाहांनी केला. तर कितीही ताकद लावा छत्रपती संभाजीनगर नाव कुणीही बदलू शकणार नाही. असंही शाहा म्हणाले.