महाराष्ट्राच्या राजकारणात मेहुणे-मेव्हण्यात टशन! धनंजय मुंडेंच्या मेव्हण्याचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा
Dhananjay Munde : परभणीतल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आमदार गुट्टे विरुद्ध माजी आमदार मधुकर केंद्रे यांच्यात वाद पुन्हा पेटलाय. धनंजय मुंडेंचे मेहुणे मधुसूदन केंद्रें यांनी ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. केंद्रे यांनी गुट्टेंविरोधाची भूमिका घेतल्यानं त्याचे पडसाद परळी मतदारसंघातही उमटलेत.
Maharashtra Assembly Elections 2024 : परभणी आणि बीड जिल्ह्यात मेहुणे-मेव्हण्यात टशन पाहायला मिळतेय. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महायुतीनं रत्नाकर गुट्टे यांना पुरस्कृत केलंय.
मात्र, गुट्टे यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका धनंजय मुंडे यांचे मेहुणे माजी आमदार डॉ.मधुकर केंद्रे यांनी घेतलीय. केंद्रे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत गुट्टे यांच्यावर हल्लाबोल केलाय. तसेच उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार विशाल कदम यांना जाहीर पाठिंबा दिलाय.
गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात मधुकर केंद्रेंनी विरोधाची भूमिका घेतल्यानंतर त्याचे पडसाद परळीमध्ये देखील उमटू लागले आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कृषी मंत्री धनंजय मुंडे विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेसाहेब देशमुख यांच्यात लढत होणार आहे.
रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजेभाऊ फड यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. आता फड यांनी निवडणुकीतून माघार घेतली असून धनंजय मुंडे यांच्याविरोधात प्रचार करणार आहे. विधानसभेच्या महासंग्रामात प्रचारात महायुती आणि मविआचे नेते एकमेकांवर निशाणा साधत असताना गंगाखेड आणि परळीतील मेव्हुण्या मेव्हुण्यातील आरोप-प्रत्यारोपामुळे प्रचारात रंगत आलीय.