Maharashtra Assembly Elections 2024 :  बीडमधील परळी हा चर्चेतला मतदारसंघ. आपल्या पराभवासाठी व्यूहरचना सुरू आहे, असा दावा धनंजय मुंडेंनी केलाय. यावर राष्ट्रवादी शरद पक्षाकडून जोरदार टीकास्त्र डागण्यात आलंय. आपला राजकीय अस्त करण्याचा डाव असल्याचं वक्तव्यही धनंजय मुंडेंनी केलंय. त्यामुळे धनंजय मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परळी हा धनंजय मुंडेंचा बालेकिल्ला. मात्र आपल्या बालेकिल्ल्यातच पराभव होण्याची भीती धनंजय मुंडेंना वाटू लागलीय का असा प्रश्न उपस्थित झालाय. आपला पराभव करण्यासाठी व्यूहरचना केली जात आहे, असा गौप्यस्फोट धनंजय मुंडेंनी केलाय. माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना आहे, असा दावाही मुंडेंनी केलाय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी परळीतील व्यापा-यांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलंय.


मुंडेंच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची प्रतिक्रिया समोर आलीय. तुमच्या 10 वर्षातल्या भानगडींमुळेच तुम्ही चक्रव्यूहात अडकलात अशा शब्दात राजेसाहेब देशमुखांनी टोला लगावलाय.


परळीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होत आहे. धनंजय मुंडेंविरोधात शरद पवारांच्या पक्षानं राजेसाहेब देशमुखांना रिंगणात उतरवलंय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीडमधून पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला होता. धनंजय मुंडेंची ताकद सोबत असताना पंकजांच्या पदरी पराभव आला. आता विधानसभेच्या रणधुमाळीत आपला गड राखण्याचं आव्हान धनंजय मुंडेंसमोर आहे. त्यातच धनंजय मुंडेंनी आता भावनिक कार्ड खेळल्याचं बोललं जातंय. मात्र धनंजय मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे आहे, याबद्दल आता विविध चर्चा सुरू झाल्यात. 


बीडमध्ये पंकजा मुंडे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. भाजप नेत्या संगीता ठोंबरे यांनी राष्ट्रवादीत शरद पवार पक्षात प्रवेश केलाय. खासदार बजरंग सोनावणे यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी SPमध्ये प्रवेश केला. संगीता ठोंबरे यांच्यात रुपात केज विधानसभा मतदारसंघात भाजपला खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादी SP पक्षात संगीता ठोंबरे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.