11 वर्षांनंतर मोठा खुलासा! सुशीलकुमार शिंदे यांनी 2013 साली वापरलेल्या `त्या` एका शब्दामुळे काँगेस कोंडीत
Maharashtra Politics : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.. 11 वर्षानंतर याचा खुलासा झाला आहे.
Sushil Kumar Shinde : काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एका मुलाखतीत मोठं वक्तव्य केलंय. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात गृहमंत्री असताना शिंदे यांनी भगवा दहशतवाद हा शब्द वापरला होता. या संदर्भात त्यांनी एक स्पष्टीकरण दिलंय. 11 वर्षानंतर याचा खुलासा झाला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एका पोडकास्टमध्ये एक मोठं वक्तव्य केलंय. गृहमंत्रिपदावर असताना आपण वापरलेला भगवा दहशतवाद हा शब्द आपल्याला वापरायचा नव्हता असं स्पष्टीकरण सुशीलकुमार शिंदे यांनी दिलंय. त्यावेळी जे काही रेकॉर्डवर आले तेच सांगितलं,असंही शिंदे यांनी म्हटलंय.
सुशीलकुमार शिंदे नेमकं काय म्हणाले?
'मला माझ्या पक्षाने भगवा दहशतवाद होत असल्याचं सांगितलं. त्यामुळेच पक्षाच्या सांगण्यावरुन मी तो शब्द वापरला. मी तेव्हा दहशतवाद हा शब्द वापरला, पण हा शब्द का वापरला, हे मलाही माहीत नाही. असे बोलायला नको होते. तो शब्द चुकीचा होता. प्रत्येक पक्षाची विचारधारा असते. पांढरा, लाल किंवा भगवा...असा कोणताही दहशतवाद नसतो'
भगवा दहशतवाद या शब्दाच्या वापरामुळे शिंदे यांना यापूर्वीच टीकेचं धनी व्हावं लागलं होतं. भगवा दहशतवाद हा शब्दाचा प्रयोग पी.चिंदबरम यांनी सुरूवातीला केला होता. त्यानंतर यूपीए-2 मध्ये सुशीलकुमार शिंदे यांनी भगवा दहशतवाद या शब्दाचा वापर केला होता.
गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 2013 साली हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला होता. शिंदेंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतरही शिंदे त्यांच्या वक्तव्यावर ठाम होते. मात्र,आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भगवा दहशतवाद शब्दावरून चूक मान्य केल्यानं काँग्रेस पक्ष कोंडीत सापडण्याची शक्यता आहे.