Maharashtra Assembly Elections 2024 :  विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवरायांच्या मंदिराचा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारण्याची घोषणा केली. या घोषणेची फडणवीसांनी खिल्ली उडवली. एवढंच नव्हे तर हिंमत असेल तर मुंब्रा शहरात शिवरायांचं मंदिर बांधण्याचं आव्हान दिलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं फडणवीसांच्या या टीकेवर पलटवार केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडीची सत्ता आली तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधण्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. एवढंच नव्हे तर सुरतेतही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार असल्याचं ठाकरेंनी सांगितलं. उद्धव ठाकरेंच्या या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांनी टीका केलीय. उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मुंब्र्यात शिवरायांचं मंदिर उभारावं असं आव्हान देवेंद्र फडणवीसांनी दिलंय.


बीकेसीतील सभेत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांसह एकनाथ शिंदेंचा खरपूस समाचार घेतला...शिवाजी महाराजांची मंदिरे बांधू म्हटल्यावर मला देवाभावू आव्हान देतात..आमच्यातला गद्दार तुम्ही ठाणे जिल्ह्यातूनच फोडलात.. त्या जिल्ह्यात तुम्हाला शिवरायांचं मंदिर बांधणं अवघड वाटतंय का? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना विचारला....


शिवसेनेनंही उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची संधी सोडली नाही. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी काय केलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. अडीच वर्षांच्या सत्ताकाळात बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उद्धव ठाकरे उभारु शकले नाहीत असा टोलाही शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाटांनी लगावलाय.


फडणवीसांनी केलेल्या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिलंय. मुंब्रा शहरातल्या दर्शनी भागात शिवाजी महाराजांचा पुतळा असल्याची आठवण आव्हाडांनी करुन दिलीय. शिवाय सरकारनं जागा आणि परवानगी दिल्यास मंदिर उभारतो आणि उद्घाटनाला फडणवीसांना बोलावतो असं प्रतिआव्हान आव्हाडांनी दिलंय.


फडणवीसांनी केलेल्या टीकेचा संजय राऊतांनी खरपूस भाषेत समाचार घेतलाय. फडणवीस शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या संकल्पनेची चेष्टा केलीय. मुंब्र्यात काय पाकिस्तानात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारु असं संजय राऊतांनी ठणकावून सांगितलंय.