Mahadev Jankar Challange: राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी ईव्हीएम हॅक होत असल्याचा दावा केलाय. मी इंजिनियर आहे. मला माहिताय ईव्हीएम हॅक होतं.. त्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात असल्याचं म्हणत जानकर यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केलाय. याविरोधात आंदोलन उभारण्याचा इशाराही जानकर यांनी दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईव्हीएम हॅक करणं शक्य आहे.त्यामाध्यमातून लोकशाही धोक्यात घालण्याचं सत्ताधाऱ्यांचं षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांनी केलाय.त्यामुळं याला लोकशाही म्हणता येणार नाही. लोकशाहीचा खून करण्याच काम झालंय.. असं म्हणत महादेव जानकर यांनी आंदोलन झेडण्याचा इशारा दिलाय..


ईव्हीएमविरोधात बोलताना जानकर यांनी सातारा जिल्ह्यातील मतदारसंघात झालेल्या मतदानाचा दाखला दिलाय. कराड उत्तर मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाळासाहेब पाटील यांना 90 हजार 935 मतं पडली होती. पाटण मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत पाटणकर यांना 90 हजार 935 मतं पडली.  साताऱ्यातील या लढतींचा दाखला जानकरांनी दिलाय.


तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महादेव जानकर हे बातम्यांमध्ये राहण्यासाठी करत असल्याचं म्हणत टोला लगावलाय.


विधानसभेच्या निवडणुकांमधल्या पराभवानंतर मविआच्या नेत्यांसोबतच लहान पक्ष आणि अपक्षांनीही ईव्हीएमविरोधात शंका उपस्थित केलीय. आता महादेव जानकर यांनी याविरोधात लढा उभारण्याचा इशारा दिलाय.


महाराष्ट्रातल्या 22 उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज


विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएमविरोधात मोहीम सुरु केलीय. ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा पराभूत आमदारांना संशय आहे. ईव्हीएमवर संशय असणाऱ्या आमदारांमध्ये भाजप नेते राम शिंदे यांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातल्या एकूण 22 उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलेत. उमेदवारांना एकूण मतदान केंद्रांच्या पाच टक्के मतदान केंद्रांवरील ईव्हीएम पडताळणी करता येते. एका केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी 47 हजार 200 रुपये शुल्क लागतं. कोर्टात कुणी आव्हान न दिल्यास अर्ज केल्याच्या 45 दिवसांत ही पडताळणी होते.यामध्ये संगमनेरचे काँग्रेस उमेदवार बाळासाहेब थोरात, पुणे कॅन्टोनमेंटचे उमेदवार रमेश बागवे, कर्जत जामखेडचे भाजप उमेदवार राम शिंदे, नगर शहर अभिषेक कळमकर, पारनेरच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राणी लंके, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राहुरीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे, कोपरगावचे संदीप वरपे, विक्रमगडचे सुनील भुसारा, हडपसरचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप, शिरूरचे अशोक पवार, खडकवासल्याचे सचिन दोडके, चिंचवडचे राहुल कलाटे, तुमसरचे उमेदवार चरण वाघमारे, अणुशक्तीनगरचे फवाद अहमद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोपरी पाचपाखाडीचे उमेदवार केदार दिघे, ठाणे शहरचे उमेदवार राजन विचारे, ओवळा माजिवड्याचे नरेश मणेरा, डोंबिवलीचे दीपेश म्हात्रे, ऐरोलीचे एम. के. मडवी, बविआचे वसईचे उमेदवार हितेंद्र ठाकूर,  नालासोपाराचे उमेदवार क्षितीज ठाकूर बोईसरचे उमेदवार राजेश पाटील यांचा समावेश आहे.