Manoj Jarange On Chhagan Bhujbal: मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक असताना भुजबळाच्या बालेकिल्ल्यात जाऊन मनोज जरांगेंनी थेट आव्हान दिलंय. गेल्या 5 वर्षात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत पाडा. असं आवाहन मनोज जरांगे-पाटलांनी येवल्यातील मराठा समाजाला केलंय. मी कोणाचं नाव घेणार नाही,त्यांची नाव लक्षात ठेवा आणि मतदान करताना आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा,असा सूचक संदेश जरांगेंनी भुजबळ यांचं नाव न घेता दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येवल्यात जरांगे-पाटील यांनी विविध गावांमध्ये जाऊन आक्रमकपणे प्रचार केलाय.त्यांचा हा दौरा तब्बल दहा तास सुरू होता. या दौऱ्यात जरांगेंनी दलित, मुस्लिम, मराठा समाजाची मोट बांधत भुजबळांविरोधात शड्डू ठोकलाय. मात्र, मराठा नेते माझ्या प्रचारात सक्रिय आहेत असं सांगत भुजबळ यांनी जरांगेंच्या मोहिमेकडे दुर्लक्ष केलंय


गेल्या वर्षभरापासून मराठा विरुद्ध ओबीसी या लढतीमध्ये भुजबळ विरुद्ध जरांगे अशी लढत पाहायला मिळतेय. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच जरांगेंनी भुजबळाच्या बालेकिल्यात जाऊन मोहिम उघडल्यानं भुजबळांना फटका बसेल का? याची चर्चा सुरू झालीय.


मराठा विरुद्ध ओबीसी मतांचे गणित सत्तेची आकडेवारी ठरवणार?


मराठवाड्यातील विधानसभा निवडणूक ओबीसी विरुद्ध मराठा अशीच होण्याची शक्यता आहे. जरांगेंनी माघार घेतली असली तरी मराठवाड्यात जरांगे फॅक्टर कायम आहे. अनेक ठिकाणी जातीच्या आधारे मतदान होण्याची शक्यता आहे. मतदारच जातीजातीत विभागल्यानं मराठवाड्यातील प्रस्थापितांना मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झालीय.लोकसभा निवडणुकीप्रमाणं मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी सामना होण्याची दाट शक्यता निर्माण झालीय. निवडणुकीच्या राजकारणातून मनोज जरांगे पाटलांनी माघार घेतली असली तरी त्यांचं मराठा आरक्षणविरोधकांना पाडा ही घोषणा कायम आहे. या घोषणेमुळंच मराठवाड्यातील अनेक मतदारसंघात छुपा संघर्ष उभा राहू लागलाय. बीडच्या गेवराई मतदारसंघात वंचितच्या प्रियंका खेडकरांना पाठिंबा दिल्याची घोषणा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली. गेवराईत परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या पूजा मोरे रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आलेल्या संभाजीराजेंनी पूजा मोरेंना जरांगे पाटलांचा पाठिंबा देतील असा विश्वास व्यक्त केलाय.गेवराईत उघड-उघड मराठा विरुद्ध ओबीसी सामना रंगतोय. पण इतर मतदारसंघात जात आणि पक्ष पाहून मतं कुणाला द्यायची हे ठरवलं जात असल्याचं सांगण्यात येतंय. वरवर जरांगेंची माघार दिसत असली तरी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला तोंड फुटलंय. त्याचा परिणाम मराठवाड्यातील अनेक निकालांत नक्कीच दिसेल.