`मी गृहमंत्री झालो तर महायुतीचे 60 टक्के नेते....` रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं
Rohit Pawar On HomeMinister: विधानसभा निवडणुकीला अवघे 8 दिवस राहिले असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Rohit Pawar On HomeMinister: विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीला अवघे 8 दिवस राहिले असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान शरद पवार यांच्या पक्षाचे नेते रोहित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. काय म्हणाले रोहित पवार? सविस्तर जाणून घेऊया.
2004 साली छगन भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर राज्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असती असं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. '2004 मध्ये अजित पवार, जयंत पाटील, रामराजे निंबाळकर यांच्यासारखे अनेक मोठे नेते पक्षांमध्ये होते. भुजबळांना जर मुख्यमंत्री केलं असतं तर नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असती आणि महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण झाली असती असं पवार साहेबांना म्हणायचं असावं' असं रोहित यांनी स्पष्ट केलं.
'गृहमंत्री झालो तर...'
मी चुकून जरी गृहमंत्री झालो तर महायुतीचे 60% नेते गुवाहाटीला राहायला जातील असं विधान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. कर्जत जामखेड मतदार संघातील जामखेड येथे प्रचार प्रचार सभेचे आयोजन केलं होतं. या प्रचार सभेत रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असे बॅनर झळकले. यावर बोलताना रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भावना असतात त्या त्यांनी व्यक्त केल्या आहेत, असं ते म्हणाले. मात्र चुकून जरी मी गृहमंत्री झालो तर महायुती सरकार मधले 60% नेते गुहाटीला राहतील असे रोहित पवार म्हणाले. 'जरी गृहमंत्री नाही झालो तरी जे कोणी गृहमंत्री होतील त्यांच्याकडे कागदपत्रासहित पुरावे देऊन कारवाई करू आणि सामान्य जनतेचा पैसा सामान्य जनतेच्या विकास कामासाठी वापरू' असे त्यांनी म्हटले.
'...म्हणून 2004 मध्ये भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही'
मविआमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या महाराष्ट्रातील मुरब्बी राजकारणी अशी ओळख असणाऱ्या शरद पवार यांनी नुकताच एक गौप्यस्फोट केला. सध्या विविध ठिकाणी प्रचारसभा आणि दौऱ्यांच्या निमित्तानं प्रवास करणाऱ्या पवारांच्या या वक्तव्यामुळं राजकारणात नव्या चर्चांनी जोर धरला आहे. कारण, पवारांनी भुजबळांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत एत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2004 साली भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही, पण असं नेमकं का करण्यात आलं यामागचं कारण त्यांनी स्पष्ट केलं. 2004 मध्ये भुजबळांकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. छगन भुजबळांना नंतर तुरुंगात जावं लागलं, एका एका वृत्तपत्राला मुलाखत देतेवेळी पवारांनी हा गौप्यस्फोट केला. '2004 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत (तत्कालीन) राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही मी मुख्यमंत्रिपद कॉंग्रेसकडे दिलं. तेव्हा ‘सिनिअर’ म्हणून माझ्यापुढे नाव होतं छगन भुजबळांचं. भुजबळांचं नंतरचं राजकारण तुम्ही बघा. त्यांना तुरूंगात जावं लागलं. त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिलं असतं, तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती', असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला.