भाजप खासदार धनंजय महाडिकांना वादग्रस्त विधान भोवणार, निवडणूक विभागाने उचलंल `हे` पाऊल
MP Dhananjay Mahadik: भाजप खासदार धनंजय महाडिक यांना जाहीर सभेतील वादग्रस्त विधान भोवण्याची शक्यता आहे.
MP Dhananjay Mahadik: भाजप खासदार धनंजय महाडिक यांना जाहीर सभेतील वादग्रस्त विधान भोवण्याची शक्यता आहे. जाहीर सभेत बोलताना लाडकी बहीण योजनेसंदर्भात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टिका होऊ लागली. कांग्रेस महिला संघटनादेखील आक्रमक झाल्या. यानंतर धनंजय महाडिकांनी माफी मागितली. पण त्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. त्यांना आता निवडणूक आयोगाने नोटीस धाडली आहे.
काय म्हणाले होते धनजंय महाडिक?
ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतायत त्या जर कांग्रेसच्या प्रचारसभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढा. त्यांची व्यवस्था आपण करु.
धनजंय महाडिकांविरोधात आक्रमक
भाजप खासदार धनंजय महाडिकांच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील विधानावरून विरोधक आक्रमक झालेत. काँग्रेस नेते सतेज पाटलांनाही त्यांच्यावर टीका केलीये. धनंजय महाडिकांची पार्श्वभूमी गुंडगिरीची आहे त्यामुळेट त्यांनी महिलांचा अपमान केला. भाजपच्या खासदाराने असं वक्तव्य करणं म्हणजे त्यांचं खरं स्वरुप कळल्याचंही पाटील म्हणालेत.
लाडकी बहिणी योजनेचे 1500 रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, असे वादग्रस्त विधान भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलं होतं.
टीकेची झोड उठल्यानंतर मागितली माफी
सर्वप्रथम माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो.माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली असल्याचे ठामपणे नमूद करताना विशेषतः वोट जिहाद करणाऱ्या महिलांच्या प्रती आलेली स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचे धनंजय महाडिक म्हणाले.
मी माझ्या वैयक्तिक, राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे. मी आणि माझ्या पत्नीमार्फत गेली अनेक वर्षे भगीरथी महिला संस्थेमार्फत महिलांच्या आत्मनिर्भरते साठी नेहमीच चांगले काम करत आलो आहे आणि ह्या पुढे देखील करत राहीन.
महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणबाबत माझ्या ह्या प्रयत्नांची दखल घेऊन माझ्या वक्तव्याने मन दुखावलेल्या माझ्या भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील, अशी आई अंबाबाई चरणी मी प्रार्थना करतो, असे ते आपल्या माफिनाम्यात म्हणाले आहेत.
निवडणूक आयोगाकडून नोटीस
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. निवडणुकीची आचार संहिता 15 ऑक्टोंबरपासून लागू झालेली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप फुलेवाडी करवीर येथील राजकीय प्रचाराची जाहीर सभा होती. या सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता - 2023 चे कलम 179 अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतचा खुलासा तात्काळ सादर करण्यात यावा अशी नोटीस त्याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण यांनी धनंजय महडिक यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.