मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय. भीमा-कोरेगावच्या घटनेबद्दल राग आहे, मात्र जनतेनं संयम बाळगावा असं आवाहनही आंबेडकर यांनी केलंय.


स्कूल बसेस बंद


आज महाराष्ट्र बंदची हाक लक्षात घेऊन स्कूल बसेस बंद ठेवण्याचा निर्णय मुंबईतल्या स्कूल बस चालक मालक संघटनेनं घेतलाय. त्यामुळे ४० हजार स्कूल बसेस चालणार नाहीत. नाशिक औरंगाबादबादमध्ये शाळांना सुटी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलीय.. पण शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी मुंबई आणि परिसरात सुटी नसल्याचं म्हटलंय.


शाळा कॉलेजेस सुरूच


कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिलीये. मात्र राज्यातील शाळा आणि कॉलेजेस सुरु राहाणार असल्याची माहिती शिक्षण अधिका-यांकडून देण्यात आलीये. शाळा किंवा कॉलेजेसला सुट्टी जाहीर करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नसून शाळा आणि कॉलेजेस नियमीत सुरु रहातील असं मंगळवारी जाहीर करण्यात आलं. 


नाशिक आणि औरंगाबादमध्ये शाळा बंद 


महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक आणि औरंगाबादमध्ये अनेक शाळा बंद राहणार आहेत. शाळांनी स्वतःहून हा निर्णय घेतलाय. पालकांनी मुलांना शाळेत पाठवू नये असा शाळांकडून निरोप गेला आहे. औरंगाबादमध्ये आयुक्तांच्या आदेशानुसार मनपा शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे आजचे पेपरही पुढे ढकलण्यात आलेत.


पेपर पुढे


बंदच्या पार्श्वभूमीवर आज सावित्रीबाई फुले विद्यापिठात होणारा एम.फार्म. चा पेपर पुढे ढकलण्यात आलाय. ही परीक्षा पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यात होणार होती. राज्याच्या काही भागात संवेदनशील परिस्थइतीच्या पार्श्वभमीवर विद्यापीठ प्रशासनाकडू हा निर्णय घेण्यात आलाय. पेपर केव्हा घेतला जाणार याबाबत नंतर विद्यापीठाच्या वेबसाईटच्या माध्यमातून सविस्तर कळवण्यात येईल.


रिक्षा चालक मालक संघटना सहभागी


महाराष्ट्र बंदमध्ये ठाणे आणि कोकणातल्या रिक्षा चालक मालक संघटना सहभागी होणार आहेत.. ठाणे रिजन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनानेनं हा निर्णय घेतलाय. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमधले सुमारे सव्वा लाख रिक्षा आणि १० हजार टॅक्सी उद्या रस्त्यावर धावणार नसल्याचं संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी सांगितलंय. त्याचप्रमाणे लाल बावटा रिक्षा संघटनाही बंद मध्ये सहभागी होणार असल्यानं कल्याण-डोंबिवली परिसरातल्या सर्वच रिक्षा बंद राहण्याची शक्यता आहे.


डबेवाल्यांची सेवा आज बंद


आज मुंबईत डेबाल्यांनीही आपली  सेवा बंद ठेवलीये. भिमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत.  आज काही दलित संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलीये.. मुंबईतही बंदची हाक दिलीये. या बंदमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे डबेवाल्यांनी आपली सेवा बंद ठेवलीये. भीमा-कोरेगाव येथील जी घटना घडली त्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात सामाजिक सलोखा कायम राखावा असे आवाहन मुंबईचे डबेवाले करत आहे.