बीड : परिवर्तनाच्या चळवळीला गती देणारा एक विवाह सोहळा येथे पाहायला मिळाला. तोही दुष्काळ सदृश्य भागात. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात पेंडगाव गावात अंबादास जाधव यांच्या मुलीचे लग्न एक खास चर्चेचा विषय झालाय. कारणही तसेच आहे. लग्नात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी रक्तदान केले. 65 लोकांनी रक्तदान करुन समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्न म्हटले की, खर्चिक कार्यक्रमाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, भरमसाठ खर्च न करता समाजउपयोगी उपक्रम राबवून अंबादास जाधव यांनी हा नवा पायंडा पाडला. त्यांनी आपल्या मुलीच्या विवाहप्रसंगी रक्तदान, शेतकर्‍यांना गो-दान यासह विविध समाजिक उपक्रम राबवून एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला. सध्या या विवाहाची राज्यात चर्चा होत आहे. 


पेंडगाव येथील एका सामान्य कुटुंबातील अंबादास जाधव यांनी नारळ विक्रीपासून व्यवसायाला सुरुवात केली. यादरम्यान स्वतः उच्च शिक्षण घेवून मुलांना चांगले शिक्षण दिले. आज घरामध्ये मुले, मुली, जावई असे मिळून डझनभर डॉक्टर आहेत. मात्र, या यावेळी ते गरिबीला आणि त्यांच्या संघर्षाला विसरले नाही. कुठलेही शुभकार्य असो, समाजिक उपक्रम राबवून ते करत आहेत. या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे.



काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या मुलीच्या लग्नामध्ये आलेल्या सर्व वर्‍हाडी मंडळीची आरोग्य तपासणी केली होती. आणि लहान मुलगी मोहिनी हिचा विवाह बीडमध्ये पार पडला. यात महत्त्वाचे म्हणजे रक्तदान, यावेळी ६५ वऱ्हाडी मंडळीनी रक्तदान केले. मोहिनी आणि मनोज हे दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. समाजात काम करत असताना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आरोग्यच्या समस्या आहे. त्यामुळे आपण देखील समाजाचे देणे लागतो. म्हणून हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.