Maharashtra News Today: महायुतीत नाराजीनाट्य असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. तसंच, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुखपत्रातून अजित पवारांना युतीत घेऊन चूक केली, असं म्हणत भाजपला सुनावलं होतं. त्यामुळं महायुतीत नाराजी असल्याच्या चर्चा वारंवार होत होत्या. अलीकडेच भाजपची कोअर कमिटीची बैठक पार पाडली. या बैठकीत महायुतीतील घटक पक्षांच्या तक्रारींचा पाढाच वाचला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 18 आणि 19 जुलै रोजी भाजपची बैठक पार पडत आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी व सहप्रभारी दोघेही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीसाठीच्या रोड मॅपसह जागावाटप आणि मित्रपक्षावरदेखील चर्चा झाली. तेव्हा भाजपच्या काही नेत्यांकडून अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या गटाबाबत तक्रारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून लोकसभेला मदत झाली नसल्याची तक्रार भाजपच्या काही नेत्यांनी केली आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांनी काही मतदारसंघात अपेक्षित मदत केली नाही, त्यांच्या पक्षाचे आमदार प्रमुख नेते मविआच्या उमेदवारांना निवडणुकीत मदत करत असल्याच्या तक्रारी काही नेत्यांनी मांडल्या आहेत. 


भाजपच्या नेत्यांनी यावेळी दिंडोरी, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे मतदारसंघाचे उदाहरण देत अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या तक्रारी केल्या आहेत. शिंदेंच्या सेनेकडून देखील जालना, परभणीत मदत न झाल्याची नेत्यांची बैठकीत तक्रार करण्यात आली. दगाफटक्यामुळे जालना हा वर्षानुवर्षे निवडून आणणारा मतदारसंघ आपण मागवला, असंही बैठकीत सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा घोळ झाला. त्याचा फटका बसल्याचा देखील काहींचा सूर असल्याची माहिती आहे.  मात्र विधानसभा निवडणुकीत याची खबरदारी घेत मित्रांना देखील सूचना द्यावा, असं नेत्यांचं आवाहन आहे. जागावाटप करून लवकरात लवकर उमेदवार जाहीर करा, अशीही मागणी करण्यात आली आहे. 


'विधानसभेला महायुती म्हणूनच सामोरे जायचं'


विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जायचं, असा निरोप केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी राज्यातील भाजप नेत्यांना दिला आहे. महायुती म्हणून ताकद दाखवा, सोबतच भाजपची ताकद देखील प्रकर्षानं त्यावेळी दिसली पाहिजे यासाठी प्रयत्न करा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्रित बैठकीत ठरवणार.