बारावीच्या निकालाचा टक्का घसरला; 17 महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेचा निकाल शून्य टक्के
Maharashtra HSC Result 2023: बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. त्यानंतर शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी, पालकांना दुपारी दोन वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येईल.
Maharashtra HSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकाला निकालानुसार यंदा बारावीचा निकाल (HSC Result) 91.25 टक्के लागला आहे. यंदा देखील या बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा निकाल हा 93.73 टाके लागला आहे. तर मुलांचा निकाल हा 89.14 टक्के लागला आहे. नऊ विभागांमध्ये यंदा देखील कोकण विभागाने अव्वल क्रमांक पटकावला असून या विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा (Mumbai) असून तो 88.13 टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली आहे.
बारावीच्या परीक्षेत यंदा 14 लाख 28 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. राज्याचा निकाल 91.25 टक्के इतका लागला असून 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा हा निकाल कमी लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बारावीचा निकाल 2.97 टक्क्यांनी घटला आहे. तर दुसरीकडे मुंबई विभागाचा निकाल देखील घसरला आहे. मुंबई विभागाचा निकाल 88.13 टक्के लागला असून इतर विभागांमध्ये हा सर्वात कमी निकाल आहे.
17 महाविद्यालयांचा शून्य टक्के निकाल
धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील 17 महाविद्यालयांमध्ये एकही विद्यार्थी पास झालेला नाही. या महाविद्यालयांच्या विज्ञान शाखेतील एकही विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागांचा निकाला दुपारी 2 वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे. यंदा 154 विषयासाठी इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आल्या होत्या. विभागीय मंडळाचा निकाल पहिला तर यात पुणे विभागाचा निकाल हा 93.34 टक्के लागला आहे. नागपूर विभागाचा निकाल हा 90.35 टक्के,औरंगाबाद विभागाचा निकाल हा 91.85 टक्के लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल हा 88.13 टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल हा 93.28 टक्के, अमरावती विभागाचा निकाल 92.75, नाशिक विभागाचा निकाल 91.66 टक्के लागला आहे. तर लातूर विभागाचा निकाल हा 90.37 टक्के लागला आहे आणि कोकण विभागच निकाल हा 96.01 टक्के लागला आहे.राज्यातील एकूण निकाल हा 91.25 टक्के लागला आहे.