Maharashtra Cabinet Expansion: राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) नेत्यांचा शपथविधी पार पडून 10 पेक्षा जास्त दिवस उलटूनही अद्याप मंत्री खात्याविनाच आहेत. गेल्या वर्षभरापासून मंत्रिपदाची वाट पाहणाऱ्या शिंदे गटातील आमदारांचा नव्याने आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना महत्त्वाची खाती देण्यास विरोध असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच खातेवाटप लांबलं जात असल्याची चर्चा आहे. त्यातच रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत खातेवाटपावर महत्त्वाची चर्चा झाली. यावेळी खातेवाटपावर एकमत झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला असून, खातेवाटप लांबणीवर पडलं आहे. दरम्यान, वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत खातेवाटपाचा तिढा सुटला असल्याची माहिती आहे. 


'वर्षा'वर रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत महत्वाची चर्चा झाली. बैठकीत खातेवाटप व मंत्रिमंडळ विस्तार याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. कोणाला कोणतं खातं मिळणार, कोण मंत्री होणार याची यादी तयार करण्यात आली आहे. यासोबतच वादाला पूर्णविराम मिळाला आहे. 


राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत बंड पुकारल्यानंतर अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. 2 जुलै रोजी या सर्वांचा राजभवनात शपथविधी पार पडला. मात्र शपथविधी होऊन 10 दिवस झाले असले तरी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अद्याप खात्यांचे वाटप झालेलं नाही. बिनखात्याचे मंत्री असल्याने त्यांच्यात अस्वस्थता असून, दुसरीकडे विरोधकांनाही टीकेची संधी मिळत आहे.


मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा हा तिढा सोडवण्याठी बैठकांचं सत्र सुरु होतं. सोमवारी रात्रीही मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक पार पडली होती. मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ही बैठक सुरु होती. त्यानंतर मंगळवारी दुपारी अजित पवार यांनी फडणवीस यांची भेट घेतली. पण या भेटींमधूनही तिढा सुटला नव्हता. त्यानंतर मंगळवारी रात्री तिन्ही नेते पुन्हा एकत्र आले. मात्र यावेळी सकारात्मक चर्चा होऊन एकमत झाल्याची माहिती आहे. 


सोमवारपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं खातेवाटप होणं महत्त्वाचं आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे खातेवाटप रखडले असले तरी त्या मंत्रायलयात दालन आणि बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी असताना देण्यात आलेला देवगिरी बंगला देण्यात आला आहे. तसंच मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर त्यांचं कार्यालय असणार आहे. 


छगन भुजबळ यांना सिद्धगड, हसन मुश्रीफ यांना विशाळगड, दिलीप वळसे पाटलांना सूवर्णगड आणि धनंजय मुंडे यांना प्रचितगड बंगला देण्यात आला आहे. इतर मंत्र्यांना सुरुची इमारतीत शासकीय निवासस्थान दिलं गेलं आहे.