मुंबई : लोकांना अखेर ज्याची भीती होती, तेच घडलं. गेल्या आठवडाभरात कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची संख्या तिप्पटीनं वाढल्यानं कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळं थर्टी फर्स्ट पार्ट्या आणि न्यू इअर स्वागताच्या कार्यक्रमांवर विरजण पडलं आहे. राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर कठोर निर्बंध लागू करण्यात आलेत. केवळ 50 जणांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पाडावं लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंत्यसंस्कारासाठी देखील केवळ 20 जणांनाच परवानगी देण्यात आलीय. पर्यटनस्थळं, समुद्रकिनारे, गर्दीच्या ठिकाणीही निर्बंध लागू करण्यात आलेत.



अवघ्या दोन दिवसात रुग्णसंख्या दुपटीनं वाढल्यानं कठोर उपाययोजना आखण्याची वेळ आलीय.


राज्यात बुधवारी कोरोनाचे 3 हजार 900 रुग्ण आढळले होते. गुरुवारी हीच संख्या 5 हजार 368 एवढी झपाट्यानं वाढली.


मुंबईत बुधवारी कोरोनाचे 2 हजार 510 रुग्ण आढळले होते. गुरुवारी हाच आकडा वाढून 3 हजार 928 झाला. देशाच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर गुरुवारी 16 हजार 764 कोरोनाबाधित आढळले. तर 220 रुग्णांचा मृत्यू झाला.


ओमायक्रॉन रुग्णांची देशातली संख्या आता 1 हजार 270 वर पोहोचलीय. त्यातले सर्वाधिक 450 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल दिल्लीत 320, केरळमध्ये 109 तर गुजरातमध्ये 97 ओमायक्रॉन रुग्ण आढळले.


ओमायक्रॉन आणि कोरोनाचा हा झपाट्यानं वाढणारा संसर्ग चिंता वाढवणारा असल्याचं आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. गेल्या मार्च एप्रिलमध्ये डेल्टा व्हेरियंटमुळं भारतात कोरोनाची दुसरी लाट आली.


या तडाख्यात हजारो लोकांनी आपला जीव गमवावा लागला. आता 2022 मध्ये कोरोनाच्या तिस-या लाटेत त्याच चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्यात. पण नागरिकांनीही कोरोना नियम पाळून या प्रयत्नांना साथ देण्याची गरज आहे.


कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यामुळं थर्टी फर्स्ट आणि न्यू इअरच्या पार्ट्यांवर गदा आलीय.. त्यातच ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 1 हजार 300 च्या आसपास पोहोचल्यानं चिंता आणखीच वाढलीय.