मुंबई: मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असला तरी राज्याच्या इतर भागांमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ९,५१८ रुग्ण आढळून आले होते. यानंतर आता महाराष्ट्राचा मृत्युदरही देशात सर्वाधिक असल्याची बाब निदर्शनास आली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ११,८५४ नागरिक बळी पडले आहेत.  सध्या राष्ट्रीय पातळीवरील कोरोनाचा मृत्यूदर २.४९ टक्के इतका आहे. मात्र, महाराष्ट्रात हाच दर ३.८२ टक्के आहे. राज्याच्यादृष्टीने ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे सांगितले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम मंदिरामुळे कोरोना आटोक्यात येणार आहे का? शरद पवारांचा मोदींना खोचक टोला

तत्पूर्वी रविवारी महाराष्ट्रात ९५१८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर २५८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये पुण्यातील १८१२ आणि मुंबईतील १०३८ रुग्णांचा समावेश आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ३,१०,४५५ एवढी झाली आहे. यातले १,२८,७३० रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, तर आजपर्यंत १,६९,५६९ जणांना पूर्णपणे बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, संपूर्ण देशातही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रविवारी भारतात कोरोनाचे ३८,०९२ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे देशात कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याची शक्यता खरी ठरताना दिसत आहे. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयाच्या सेंटर फॉर चेस्ट सर्जरीजचे प्रमुख डॉ. अरविंद कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले की, सामूहिक संसर्ग हा आतापर्यंत धारावीसारख्या वस्त्यांपुरता मर्यादित होता. मात्र, तो आता देशातील अनेक भागांमध्ये वाढत व पसरत चालल्याचे डॉ.अरविंद कुमार यांनी सांगितले होते.