कोकणात `ताज`चे पंचतारांकित हॉटेल, पर्यटन केंद्राला चालना देण्यासाठी राज्याचा निर्णय
कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार.
मुंबई : पर्यटन हा एक प्रमुख सेवा उद्योग असून राज्याच्या आर्थिक विकासाच्या वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. हे लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने 'ताज'चे पंचतारांकित हॉटेल्स कोकणात उभारण्यास परवानगी दिली आहे. तसा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन केंद्रासाठी ताज ग्रुपला भाडेपट्टयाने जमीन देण्याचा निर्णय राज्यच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मौ. शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्यासाठी ताज ग्रुपच्या मे.इंडियन हॉटेल्स कंपनीला ५४.४० हेक्टर जमीन ९० वर्षाच्या दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टयाने देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिले पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने भूसंपादित केलेली जमीन दीर्घ भाडेपट्टयाने इंडियन हॉटेल्स कंपनीला देण्यात येईल, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.