शिंदे सरकारचं टेन्शन वाढवणारी बातमी! मालवणच्या घटनेनंतर अजित पवारांची माफी, आता पक्षानेही घेतला मोठा निर्णय
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्यानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराजांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. महायुतीवर सडकून टीकादेखील करण्यात येत आहे. अशातच युतीतील दोन्ही पक्षांपेक्षा अजित पवार गटाने वेगळी भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जाहीर माफी मागितली आहे. त्यानंतर आता अजित पवार गटाकडून आंदोलन देखील केले जाणार आहे.
अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे. जनसन्मान यात्रेचा दुसरा टप्पा सुरू आहे. यावेळी अहमदपूर येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी जाहिर माफी मागितली आहे. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ही अतिशय दुःखद घटना आहे. महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो. या प्रकरणी कायद्यानुसार संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असं पवार म्हणाले आहेत. अजित पवारांच्या माफीनाफ्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) निषेध आंदोलन करणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ठाण्यात गुरुवारी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला हे अत्यंत वेदनादायी अन् मनाला संताप आणणारे आहे. या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुरुवार, दिनांक २९ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १२ या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, तलावपाळी, ठाणे येथे 'मूक आंदोलन' करण्यात येणार आहे, अशी भूमिका पक्षाकडून मांडण्यात आली आहे.
नवीन भव्य पुतळ्यासाठी तज्ञांचा समावेश असलेली समिती
मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. छत्रपतींच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरुपात तयार करणे आणि उभारणे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महारात्ष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा. यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही.